मराठीची निर्मिती वऱ्हाडच्या बोलीपासून - डॉ. प्रतिमा इंगोले

पंडित कोंडेकर
बुधवार, 30 मे 2018

इचलकरंजी - ""मराठीची निर्मिती संस्कृतपासून नव्हे तर वऱ्हाडच्या बोलीपासून झाली आहे. याच भाषेवर संस्कार करुन संस्कृत तयार झाली आहे,"" असे मत प्रख्यात साहित्यीका डॉ.प्रतिमा इंगोले (अमरावती) यांनी व्यक्त केले.

इचलकरंजी - ""मराठीची निर्मिती संस्कृतपासून नव्हे तर वऱ्हाडच्या बोलीपासून झाली आहे. याच भाषेवर संस्कार करुन संस्कृत तयार झाली आहे,"" असे मत प्रख्यात साहित्यीका डॉ.प्रतिमा इंगोले (अमरावती) यांनी व्यक्त केले.

""बोलीची चळवळ आपण सर्वजण पुढे घेवून जाऊया, त्यातून मराठीला समृध्द करुया,"" असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लायन्स क्‍लबच्या प्रांगणात आयोजित सहाव्या राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरुन त्या बोलत होत्या. शाहिरी व लोककला अकादमी (इचलकरंजी) व मराठी बोली साहित्य संघ (नागपूर) या संस्था आयोजक आहेत. तत्पूर्वी, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन झाले. मान्यवरांच्या हस्ते "मायबोली" या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

संमोलनाध्यक्षपदाचा सन्मान एका लेखिकेला देण्याचा निर्णय हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे, असा हल्लाबोल करीत डॉ. इंगोले म्हणाल्या, ""प्रमाण भाषेच्या परखड वापरामुळे वास्तव दडपले जाते. पण बोली थेट बोलते, खरे बोलते, रोखठोक बोलते म्हणून माणसाच्या मनापर्यंत पोहचते. बोली ही स्त्रियांची मक्तेदारी आहे. कारण त्यांना कायमच प्रमाण भाषा बोलण्यास मनाई होती. त्यामुळे स्त्री कायमच बोलीचा आधार घेत अभिव्यक्त होत आली आहे. आपल्या कविता, ओव्या ही त्यांनी बोलीतच रचल्या. म्हणून लोकवाङ् मयाची भाषा बोलीच असून तोच वारसा बहिणाबाईनी चालविला.""

मराठी बोली साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. हरिश्‍चंद्र बोरकर म्हणाले, ""सुरुवातीला बोलीला विरोध करणारे नंतर बोलीच्या संवर्धनाचा ठराव केला. हळूहळू बोलीचे महत्व वाढत आहे. विविध जातीच्या बोली कमी होत चालल्या आहेत. त्यावर उपाय म्हणुन त्या बोलीची पुस्तके काढण्याची गरज आहे."" 

आपली संस्कृती, आपली भाषा, चालिरीती प्रत्येकांने जोपसण्याची आवश्‍यकता आहे. बोली साहित्य संमेलनातून भारतीय संस्कृती टिकविण्याचे काम केले जात आहे, असे प्रतिपादन उद्‌घाटनक श्री. आवाडे यांनी व्यक्त केले.

स्वागताध्यक्ष प्रताप होगाडे, नगराध्यक्षा अलका स्वामी यांचे भाषण झाले. अशोक दवंडे यांनी स्वागत तर शाहीर विजय जगताप यांनी प्रास्ताविक केले.

किर्ती व क्रांती जगताप यांनी गणेश वंदना सादर केली. सुबोध काणेकर यांनी बोली गौरव गीत गायीले. हिरामन लांजे यांनी शोक संदेशाचे वाचन केले. व्यासपिठावर कवयित्री वैशाली नायकवडे होत्या. आभार शाहीर हिंदूराव लोंढे यांनी मानले. 

किमान विद्यापीठात तरी त्या त्या परिसरातील बोलीचा अभ्यास, संशोधन होणे गरजेचे आहे. बोलीचा समावेश अभ्यासक्रमात करुन त्यावर एखादा पेपर ठेवायला हवा. त्यामुळे विद्यार्थ्यांना बोलीची गोडी लागेल. आपणही घरा - दारात बोलीचा वापर वाढवायला हवा. किमान कृषी खाते, न्यायालये व बॅंका या ठिकाणी बोलीचा वापर केला तर मराठी अधिक समृध्द होणार आहे.
- डॉ. प्रतिमा इंगोले, 
संमेलनाध्यक्षा  

Web Title: Kolhapur News Dr Pratima Ingole comment