स्पर्धा परीक्षेसाठी ध्येय वेडे व्हा 

स्पर्धा परीक्षेसाठी ध्येय वेडे व्हा 

कोल्हापूर - स्पर्धा परीक्षांची तयारी करताना कठोर परिश्रमासह ध्येय वेडे व्हा, असा सल्ला सहायक गट विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी येथे दिला. शिवाजी विद्यापीठातील राज्य सेवा पूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या प्रशिक्षण वर्गाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते. राजर्षी शाहू सभागृहात कार्यक्रम झाला. 

डॉ. जाधव म्हणाले, ""स्पर्धा परीक्षांबद्दल मनात असलेली भीती प्रथमत: विद्यार्थ्यांनी काढून टाकावी. स्वत:चा आत्मविश्वास वाढवावा. कोणताही न्युनगंड बाळगू नये. सखोल वाचन आणि त्यावरील मुद्दे यांची टिपण ठेवावी. अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिकांचा सातत्याने अभ्यास करावा. दिवसातून कमीत कमी सहा तास अभ्यास करण्यासाठी काटेकोर नियोजन करावे. विद्यार्थ्यांनी स्वत:मधील कमतरता ओळखून पुढे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, कणखरवृत्ती, हजरजबाबीवृत्ती जोपासली पाहिजे.'' 

ते म्हणाले, ""स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरताना काळजीपूर्वक भरावा. त्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. विद्यार्थ्यांनी सखोल वाचन, चिंतन, मनन यामध्ये सातत्य ठेवावे. विविध वर्तमानपत्रांमधील लेख वाचावेत. समाजकार्य करण्याची प्रचंड इच्छाशक्ती बाळगून तळागाळातील लोकांपर्यंत योजनांचा लाभ पोचविण्याची तळमळ असली पाहिजे.'' विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. या वेळी दीप्ती जाधव, तृप्ती जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. केंद्राचे समन्वयक डॉ. जगन कराडे यांनी प्रास्ताविक केले. 

कुटुबांतील सगळेच उच्चपदस्थ 
डॉ. जाधव यांच्या आई कमल जाधव या अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्यांचे वडील प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सर्व बहिणी उच्च विद्याविभूषित असून उच्चपदस्थ आहेत. डॉ. जाधव यांचे मामा आणि मावशी वरिष्ठ अधिकारी आहेत. या कुटुंबातील चारही भावंडे एकाच वेळेस सेट, नेट आणि एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच, डॉ. जाधव हे दोन वेळेस यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com