ऑनलाईन अर्ज भरताना ई-सेवा केंद्रांत लूट

ऑनलाईन अर्ज भरताना ई-सेवा केंद्रांत लूट

कोल्हापूर - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरून देताना महा- ई-सेवा केंद्रचालकांकडून उमेदवारांची आर्थिक लूट सुरू आहे. एक अर्ज भरण्यासाठी किमान ६०० रुपये उकळले जात आहेत. गावांत बॅंक नाही, त्यामुळे व्यवहार माहिती असायचा संबंध नाही; तरीही अर्जासोबत बॅंक पासबुक व पॅनकार्डची प्रत मागितल्याने या निवडणुकीपासून दुर्गम गावांतील इच्छुक दूरच राहण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज हे ऑनलाईनच भरावे लागणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची संगणकीय प्रत काढून त्याची झेरॉक्‍स व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांची झेरॉक्‍स पुन्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यावी लागणार आहे. ऑनलाईन अर्ज भरला तरच ऑफलाईन अर्ज स्वीकारला जात आहे; परंतु अनेक गावांत अर्ज भरण्यासाठी आवश्‍यक संकेतस्थळासाठी पुरेशी ‘रेंज’ मिळत नाही. त्यामुळे खेडेगावातील किंवा वाड्यावस्त्यांवरील इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी तालुक्‍याचा किंवा मोठ्या शहरांचा आधार घ्यावा लागत आहे. 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नाममात्र प्रती अर्ज ५० रुपये स्वीकारावेत, असे संकेत आहेत; पण इच्छुकांची वाढती गर्दी आणि त्यामुळे अर्ज भरण्यासाठी उडणारी झुंबड याचा फायदा महा-ई-सेवा केंद्रचालकांकडून घेतला जात आहे. पहिल्यांदा पैसे, मगच अर्ज अशी पद्धत या केंद्रचालकांकडून अवलंबली जात आहे. 

बॅंक पासबुक व पॅनकार्डची मागणी
अर्जासोबत बॅंक पासबुकची झेरॉक्‍स जोडावी लागणार आहे. शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, आजरा, भुदरगड अशा डोंगराळ तालुक्‍यांतील अनेक गावे किंवा वाड्यावस्त्यांवर बॅंकच नाही. अनेकांनी उभ्या आयुष्यात बॅंकेची पायरी कधी चढलेली नाही. त्यामुळे पॅनकार्ड असण्याचा संबंध नाही. पॅनकार्ड असेल तरच बॅंकेकडून खाते उघडून पासबुक दिले जाते. परंतु, पॅनकार्डच नसल्याने बॅंकेकडून खाते उघडण्यास असमर्थता दर्शवली जाते, त्यातून पुन्हा इच्छुकांना रिंगणातून बाहेर पडण्यास भाग पाडले जात आहे. 

नंतर ऑफलाईनच अर्ज
यापूर्वी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीतही ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा फज्जा उडाला होता. शेवटच्या दोन दिवसांत या निवडणुकांत ऑफलाईनच अर्ज स्वीकारले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत तर एका एका गावांत शेकडो अर्ज येतात. उद्या-परवा अर्ज भरण्यासाठीची गर्दी व रेंज न मिळण्याचा प्रकार यामुळे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. मग आता ऑनलाईनसाठी होत असलेल्या सक्तीमुळे, त्यातील अटीमुळे इच्छुकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com