तुम्हीच काढा तुमचा परफेक्‍ट ईसीजी

तुम्हीच काढा तुमचा परफेक्‍ट ईसीजी

कोल्हापूर - प्रवासात असतानाही तुम्ही अस्वस्थ झाला तर तुमच्या मोबाईलमधील ॲपद्वारे तुम्ही तुमचा ईसीजी काढून डॉक्‍टरांना तातडीने पाठवू शकता. त्यानंतर तुम्हाला आहे त्या ठिकाणी तातडीचे मार्गदर्शन मिळणे शक्‍य होणार आहे. यासाठी आवश्‍यक ‘ईसीजी फिल्टर’ आणि ‘ईसीजी पॉकेट ॲप’ आता तयार झाले आहे. शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागांतर्गत इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागातील डॉ. प्रदीप भास्कर यांच्याकडे चालणाऱ्या संशोधनातून हा प्रयत्न पुढे आला आहे. यातून डॉक्‍टरांकडे काढण्यात येणारा ईसीजीही परफेक्‍ट येण्यासाठी मदत होणार आहे.

देशात आज प्रत्येक ३३ सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू होत आहे. हे टाळण्यासाठी आता जगभरात वेगवेगळे संशोधन होत आहे. त्यापैकी एक शिवाजी विद्यापीठातील डॉ. प्रदीप भास्कर यांच्याकडे प्रयत्न झाला आहे. छातीत वेदना होत आहेत, चक्कर येत आहे, अशा वेळी घाबरून डॉक्‍टरांकडे गेल्यास तेथे शरीरावर बारा ठिकाणी ‘इलेक्‍ट्रोड’ लावण्यात येतात. त्यावरून थोड्याच वेळात तुमच्या हृदयाचा ताल (ऱ्हीदम) मोजला जातो. त्यानंतर तुम्हाला हृदयाचा त्रास आहे की नाही, हे समजते. मात्र, हाच ईसीजी (इलेक्‍ट्रॉनिक कार्डिओ ग्राफ) परफेक्‍ट (बिनचूक) आहेच, हे सांगता येत नाही. काही तांत्रिक मुद्यांवर तो अंदाज दर्शवितो. ईसीजीमध्ये लघु, मध्यम आणि अती अशा प्रकारच्या लहरी होताना दिसतात. त्यामुळे ईसीजीमध्ये त्रुटी राहते. मात्र, हाच ईसीजी परफेक्‍ट येण्यासाठी आवश्‍यक ‘डिजिटल फिल्टर टेक्‍निक’चे संशोधन डॉ. भास्कर यांच्या संशोधनातून पुढे आले आहे. सर्वसाधारण एका व्यक्तीला मिनिटाला ६०-७० हार्ट बीटस्‌ आवश्‍यक असतात. त्यात कमी-जादा झालेला आलेख मोजण्यासाठी ईसीजीचा उपयोग केला जातो. सध्या हाच ईसीजी मोबाईल ॲपच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्नही केला आहे. याच ॲपमध्ये ‘डिजिटल फिल्टरिंगचा प्रोग्रॅम’ बसविला जाणार आहे. मनगट आणि पायाजवळ इलेक्‍ट्रोडचे चिमटे लावून सहज ईसीजी काढता येणार आहे. हा ईसीजी ॲपमध्ये असणाऱ्या फिल्टरच्या प्रोग्रॅममुळे अचूक निघणार आहे. हा ईसीजी तुम्ही मोबाईलवरून इंटरनेटच्या माध्यमातून डॉक्‍टरांना पाठवू शकता. त्यावर तातडीने तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकणार आहे. तुम्ही प्रवासात असाल, दुर्गम भागात असाल तर या ॲपचा मार्गदर्शनासाठी उपयोग होणार आहे. यानंतर तुम्हाला जवळच्या डॉक्‍टरांकडे जाऊन उपचार घेणे सोपे जाणार आहे. तेथे पुन्हा ईसीजी काढण्यासाठी अधिक वेळ खर्च करावा लागणार नाही. सध्या शिवाजी विद्यापीठात हे संशोधन झाले असून, लवकरच ते सर्वांसाठी खुले केले जाणार आहे.

पॉकेट ईसीजी कल्पना...
तुम्ही प्रवासात किंवा इतर कोठेही असल्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा ईसीजी काढावा. त्यासाठी मोबाईलचा वापर करावा. हा मोबाईल तुमच्या खिशात राहू शकतो. म्हणून डिजिटल फिल्टर असलेल्या मोबाईल ईसीजी ॲपला ‘पॉकेट ईसीजी’ असे नाव दिले आहे. हे तयार करण्यासाठी हृदयरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्याचेही डॉ. भास्कर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com