इको फ्रेंडली हेरिटेज टुरिझम वाढतेय...!

संभाजी गंडमाळे
शनिवार, 15 जुलै 2017

वारसा जपतानाच पर्यटनासाठी विविध संकल्पनांवर भर
कोल्हापूर - महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील बहुतांश ठिकाणांच्या संवर्धनाची प्रक्रिया समाधानकारक नसली, तरी पर्यटनासाठी विविध संकल्पनांवर भर दिला जातोय. त्यातून पर्यटन वाढले आहे.

वारसा जपतानाच पर्यटनासाठी विविध संकल्पनांवर भर
कोल्हापूर - महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील बहुतांश ठिकाणांच्या संवर्धनाची प्रक्रिया समाधानकारक नसली, तरी पर्यटनासाठी विविध संकल्पनांवर भर दिला जातोय. त्यातून पर्यटन वाढले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेतर्फे (युनेस्को) वारसास्थळांच्या जतनासाठी प्रयत्न होतात. त्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील पश्‍चिम घाट, अजिंठा- वेरूळ लेणी, मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, तसेच एलिफंटा गुहा इत्यादी वारसास्थळांचा समावेश आहे. आणखी काही प्रस्ताव "युनेस्को'च्या विचाराधीन आहेत. अशा वारसास्थळांच्या जतन व संवर्धनासाठी आवश्‍यक अटीही घातल्या आहेत. जैवविविधतेने समृद्ध पश्‍चिम घाटालाही यादीत स्थान आहे.

त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी- दाजीपूर अभयारण्याचा समावेश आहे. या परिसरात बायसन नेचर क्‍लब आणि पर्यावरणप्रेमी संस्थांनी विविध उपक्रम राबवले आहेत. काजवा महोत्सव, फुलपाखरू महोत्सव अशा उपक्रमांमुळे पर्यटनाला चालना मिळते आहे.

पन्हाळगडासह शहरातील भवानी मंडप, जुना राजवाडा या ठिकाणांची पाहणीही सहा महिन्यांपूर्वी "युनेस्को'च्या पथकाने केली आहे.

साताऱ्याचा मानबिंदू असलेल्या कास पठारावर पर्यटनाच्या विविध संकल्पना यशस्वी झाल्यात. भारताला आणि पश्‍चिम घाटाला प्रदेशनिष्ठ असणाऱ्या वनस्पतींपैकी 98 वनस्पतींचा कास पठारावर आढळ आहे. पठारावरील लाल मातीचा बारीक थर, सच्छिद्र जांभा खडक, पर्जन्य, आर्द्रता, तापमान हे त्यांच्या वाढीस पोषक असल्यामुळे या सर्व सपुष्प वनस्पती पठारावर एकवटल्या आहेत. महाराष्ट्रातील एकूण वनस्पतींच्या 70 टक्के वनस्पती पठारावर आढळतात, त्यामुळे पर्यटकांची गर्दी होते.

स्थापत्यशास्त्राचा नमुना
स्थापत्य, शिल्पशास्त्र, चित्रकला, प्राचीन रंगकाम, मूर्तिशास्त्र आणि दैवतशास्त्र यांचा अनोखा संगम अजिंठ्यात; तर चाळीसगाव येथील वेरूळ लेणी भारतीय- रॉक कट आर्किटेक्‍चरसाठी प्रसिद्ध आहेत. नागपूरमध्ये वसलेले बहुतांशी वाडे शहराच्या इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर- राधानगरी अभयारण्य असो किंवा शहरातील वारसास्थळे, त्यांच्या जतन व संवर्धनासाठी "सकाळ'ने प्रयत्न केले आहेत. सलग दोन वर्षे दाजीपूर अभयारण्य स्वच्छता मोहीम आणि पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रमांसाठी प्रोत्साहनावर भर दिला आहे. शहरातील वारसास्थळांच्या जतन व संवर्धनाची मोहीम यंदापासून हाती घेतली आहे.

'युनेस्को'च्या अटीनुसारच...
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरावर ऑगस्टपासून कायमस्वरूपी एलईडी दिव्यांची विद्युतरोषणाई होणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर होत आहे. तथापि, या कामासाठी "युनेस्को'ने अटी घातल्या आहेत. खिळ्यांचा वापर न करता इॅपॉक्‍सी सोल्युशनने विद्युत माळा चिकटवल्या जाणार आहेत. त्यामुळे वास्तूच्या संवर्धनावेळी त्या सहज काढून पुन्हा लावता येणार आहेत.

पश्‍चिम घाटाची वैशिष्ट्ये
पश्‍चिम घाट 1600 किलोमीटर लांब आणि 100 किलोमीटर रुंद असा भारतातील जैववैविध्यपूर्ण आणि उन्ह्याळ्यातही हिरवाई टिकवणारा पट्टा आहे. पावसाळ्यात त्याचे सौंदर्य आणखी खुलते. या पट्ट्यात सात राष्ट्रीय उद्याने (2073 चौरस किलोमीटर) आहेत. जगात जैवविविधतेचे 34 "हॉट स्पॉट' आहेत. त्यापैकी दोन भारतात आहेत. हिमालयाच्या रांगा आणि पश्‍चिम घाट म्हणजे सह्याद्री हे ते दोन. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या सहा राज्यांत पश्‍चिम घाटाच्या पर्वतरांगा आहेत. हा परिसर चार हजार सपुष्प वनस्पती, 500 जातींचे पक्षी, 350 जातींच्या मुंग्या, 330 जातींची फुलपाखरे, 288 जातींचे मासे आणि 682 जातींच्या शेवाळांचा आहे. देशातील 20 सिसिलियन उभयचर प्राण्यांच्या जातींपैकी 16 जाती पश्‍चिम घाटात आढळतात.