अध्यक्षांनी प्रार्थनेवेळीच धरली शिक्षकाची कॉलर...

अध्यक्षांनी प्रार्थनेवेळीच धरली शिक्षकाची कॉलर...

जयसिंगपूर - हृदयविकाराचा झटका आलेल्या विद्यार्थिनीला दवाखान्यात नेण्यासाठी मोटार दिली नसल्याच्या रागातून शहरातील एका नामांकित शाळेचे अध्यक्ष विद्यार्थी आणि शिक्षकांसमोरच हातात चप्पल घेऊन संबंधित शिक्षकाच्या अंगावर धावले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास प्रार्थनेच्या वेळीच घडलेल्या या प्रकारामुळे शिक्षणक्षेत्राचा लौकिक असणाऱ्या या शहरात खळबळ उडाली. 

गुरुवारी (ता. १४) संबंधित शाळेतील विद्यार्थिनीला अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. तिला दवाखान्यात नेण्यासाठी शिक्षकाची मोटार इतर शिक्षकांनी मागितली. परंतु मोटार नवीन असून, आपण देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पर्यायी व्यवस्था करून विद्यार्थिनीला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर गुरुवारी हे प्रकरण चांगलेच धुपत राहिले. 

शुक्रवारी सकाळी प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणाऱ्या शिक्षकांचा नगरसेवक आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष या दोघांच्या हस्ते सत्काराचे नियोजन करण्यात आले. प्रार्थनेनंतर त्यांचा सत्कारही झाला. यानंतर मोटार देण्यास नकार देणाऱ्या शिक्षकाला व्यासपीठावर बोलावले. विद्यार्थिनीला रुग्णालयात नेण्यासाठी मोटार का दिली नाही, याचा जाब त्यांनी विचारला. गाडीला काही झाले असते तर भरपाई दिली असती. पण, विद्यार्थिनीला काही झाले असते तर पालकांना काय उत्तर दिले असते, असाही जाब विचारून पायातील चप्पल काढून शिक्षकाच्या अंगावर धावून गेले. कॉलर पकडून मारहाण करणार इतक्‍यात प्रसंगावधान राखून पाहुण्यांनीच दोघांना बाजूला केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थी आणि शिक्षकांपुढेच झालेल्या या प्रकाराची शहरात चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com