"त्या' मुख्याध्यापिकेचे वेतन रोखणार - शिक्षणाधिकारी

नागपूर ः कानूर बुद्रूक येथील मुख्याध्यापिकेने विद्यार्थीनीला केलेल्या शिक्षेबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन देताना आमदार संध्यादेवी कुपेकर.
नागपूर ः कानूर बुद्रूक येथील मुख्याध्यापिकेने विद्यार्थीनीला केलेल्या शिक्षेबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन देताना आमदार संध्यादेवी कुपेकर.

कोल्हापूर - मुख्याध्यापिकेने सलग पाचशे उठाबशा काढण्याची वेदनादायी शिक्षा दिलेल्या विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर आहे. अशी अघोरी शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेचे वेतन रोखण्याचे आदेश शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आज दिले. संबंधित विद्यार्थिनीची विचारपूस व घडल्या प्रकरणाची चौकशी त्यांनी सुरू केली.

कानूर येथील घडलेल्या प्रकरणाचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रथम प्रसिद्ध झाले. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी घटनेची माहिती घेतली. कानूरच्या भावेश्‍वरी संदेश विद्यालयात काळगोंडवाडी (ता. चंदगड) येथील विद्यार्थिनी विजया निवृत्ती चौगुले शिक्षण घेते. रोज तीन-चार किलोमीटर चालत शाळेला येते. वही घरी विसरली म्हणून मुख्याध्यापिका अश्‍विनी देवणे यांनी तिला पाचशे उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. कशाबशा तीनशे बैठका मारल्यानंतर पाय दुखू लागले. विजया शाळेतून घराकडे गेली. पालकांना तिने पाय दुखत असल्याचे तसेच उठाबशा काढायला लावल्याचे सांगितले. नंतर औषधोपचार घेतले. प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्याने तिला सीपीआरमध्ये दाखल केले. 
विद्यार्थिनीचे वडील त्याच शाळेत शिपाई आहेत. त्यामुळे ते सुरुवातीला तक्रार देण्यासाठी घाबरले; पण अखेर मुलीला वेदना असह्य झाल्याने तिला रुग्णालयात आणावे लागले तेव्हा घटनेचे गांभीर्य वाढले. 

घडलेल्या घटनेचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले, त्याच दिवशी चौकशीला सुरवात केली. विद्यार्थिनीची आज भेट घेऊन तिची व तिच्या पालकांचे मत जाणून घेतले. या घटनेत मुख्याध्यापिकेचे वेतन रोखण्याचे आदेश दिले आहेत. सविस्तर चौकशीत त्या दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई होणार आहे. 
- किरण लोहार 
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) 

विद्यार्थिनीवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. उठाबशा मारण्याच्या शिक्षेचा तिला मानसिक धक्का बसला आहे. डॉक्‍टरांकडून तिला बरे करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. 
- डॉ. जयप्रकाश रामानंद 
अधिष्ठाता, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 

आमदार कुपेकर यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन 
चंदगड - कानूर बुद्रुक (ता. चंदगड) येथील भावेश्‍वरी संदेश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्‍विनी अशोक देवण यांचा पगार थांबवण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आज नागपूर येथे त्यांची भेट घेऊन या प्रश्‍नाकडे लक्ष वेधल्यावर श्री. तावडे यांनी तातडीने ही कारवाई केली. 

सौ. देवण यांनी आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गृहपाठ केला नाही म्हणून पाचशे उठाबशा मारण्याची शिक्षा दिली होती. तीनशे उठाबशा मारल्यानंतर ती पडली. पायाच्या नसा सुजल्या. मणक्‍यालाही सूज आली. गंभीर अवस्थेत तिच्यावर गडहिंग्लज येथील रुग्णालयात उपचार केल्यावर घरी सोडले. दरम्यान दोन दिवसांपासून पुन्हा तिची प्रकृती बिघडली असून सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. यासंदर्भात श्रीमती कुपेकर यांनी आज हिवाळी अधिवेशनावेळी शिक्षणमंत्री श्री. तावडे यांची भेट घेऊन या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com