हत्तीच्या धास्तीने थांबली रोपांची लावण 

हत्तीच्या धास्तीने थांबली रोपांची लावण 

कोल्हापूर - मुसळधार पाऊस राधानगरी, वाकीघोल परिसरास नवा नाही. पण, ऐन पावसात हत्तीचा वावर वाकीघोल परिसरात सुरू झाल्याने भात लावणीसाठी लगबग करणारे शेतकरी धास्तावले आहेत. काळम्मावाडी धरणाच्या एका टोकापासून सुरू झालेला वाकीघोलचा पट्टा दाट झाडीचा आहे. मुसळधार पावसाचा आहे. याच पट्ट्यात पन्नास-साठ घराच्या छोट्या वाड्या आहेत. हत्तीने रात्री आख्ख्या गावात येऊन हैदोस घातला तरी सकाळपर्यंत मदतीला बाहेरचे कोणीही येणे शक्‍य नाही, अशी इथली अवस्था झाली आहे. 

या पट्ट्यात यापूर्वी दोन वेळा हत्ती येऊन गेला आहे. दोन वर्षांपूर्वी नामदेव आरेकर याला हत्तीने सोंडेने भिरकावून दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच परिसरात दोन तीन दिवसांपासून पुन्हा हत्ती आपले अस्तित्त्व दाखवू लागला आहे. 

वाकीघोल परिसरातले जंगल म्हणजे कोल्हापूरची निसर्ग संपदा आजही किती समृद्ध आहे याचे ते प्रतिक आहे. काळम्मावाडी धरणाचे पाणी (बॅक वॉटर) एका बाजूला व त्याच्या शेजारी अंतरा अंतरावर या वाड्या वस्ती आहेत. काळम्मावाडी धरणापासून सुरू झालेला हा परिसर पुढे भुदरगड तालुक्‍याला व कोकणाला जाऊन भिडतो. 

या भागात गवे आहेत. अन्य वन्य प्राणी आहेत. बिबट्या, अस्वलाच्या अस्तित्त्वाचे रोज पुरावे मिळतात, इतकी वनवैभवता आहे. इथला पाऊस म्हणजे केवळ एक अनुभवच आहे. जनावराच्या पाठीवर रप रप पडणाऱ्या पावसाचे थेंब एकसारखे पडले तर जनावराच्या पाठीवर जखमा होतात, अशा शब्दांत इथल्या पावसाची ओळख आहे. 

अशा परिसरात हत्तीचा वावर गावकऱ्यांच्या दृष्टीने धोकादायक म्हणण्यापेक्षा भितीदायक झाला आहे. विसाव्यासाठी जंगल भरपूर आहे. हिरव्यागार लुसलुशीत भात शेतीची तर चादरच या परिसरावर आहे. त्यामुळे लोकांना शेतीसाठी सतत ये जा करावी लागते. दोन वर्षांपूर्वी या परिसरात हत्ती आला. त्याला हुसकावण्यासाठी रात्री वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना फिरताना थरारक अनुभवांचा सामना करावा लागला. आता त्याच ठिकाणी दोन तीन दिवस हत्तीचे वास्तव्य आहे. पाऊस तर इतका आहे, की लोकांना बाहेर पडणे कठीण आहे. दिवस मावळला, की दरवाजे बंद अशी अवस्था आहे. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची गस्त आहे. पण, एका बाजुला जंगल, दुसऱ्या बाजुला धरणाचे बॅक वॉटर व धो धो पडणारा पाऊस अशा अवस्थेत गस्त घालणे म्हणजे आव्हान आहे. 

या परिसरात जिंजी प्रवास म्हणून एक वास्तू आहे. सभोवार जंगल व मध्येच ही भग्न वास्तू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम हे अज्ञातवासात असताना या ठिकाणी भूमिगत रहात होते, अशी स्थानिक लोकांकडून माहिती मिळते. 

हत्ती या परिसरात आला तर तो पर्यावरण, निसर्गाचा एक भाग म्हणून आम्ही जरूर त्याचे अस्तित्त्व मान्य करू. हत्तीला अन्य ठिकाणी त्याला पूरक चारा-पाणी व योग्य असे वातावरण मिळत नसेल म्हणून तो इकडे आला असेल, हे देखील आम्हाला मान्य आहे. पण, तो ही जगला पाहिजे आणि त्याच्या भीतीने उपद्रवाने इथल्या वाड्या वस्तीत राहणाऱ्या लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले नसले पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि लांब घरात बसून माणसापेक्षा हत्तीची काळजी करणाऱ्यांनी या परिसरात लोक भीतीच्या छायेत कसे राहतात, हे पाहण्याचीही गरज आहे. 
- नंदकिशोर सूर्यवंशी, कार्यकर्ता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com