चित्कारानेच परिसराला जाग

रणजित कालेकर
बुधवार, 30 मे 2018

आजरा - ग्रामीण भागातील पहाट ही कोंबडा आरवला की होत असते. हे वर्षानुवर्षांचे चित्र ठरलेले आहे; पण वेळवट्टी परिसर याला अपवाद ठरत आहे. वेळवट्टी येथील महागावकर फार्म हाऊसवरची पहाट ही टस्कर हत्तीच्या चित्काराने होत आहे.

आजरा - ग्रामीण भागातील पहाट ही कोंबडा आरवला की होत असते. हे वर्षानुवर्षांचे चित्र ठरलेले आहे; पण वेळवट्टी परिसर याला अपवाद ठरत आहे. वेळवट्टी येथील महागावकर फार्म हाऊसवरची पहाट ही टस्कर हत्तीच्या चित्काराने होत आहे.

गेले चार-पाच दिवस टस्कर पहाटे महागावकर कुटुंबांना जणू ‘गुड मार्निंग’ करायलाच येत आहे. त्याच्या आगमनाने या परिसरातील दिवस उगवत असून पहाटे घराबाहेर पडायची अडचण या कुटुंबाची झाली आहे. त्याच्या चित्काराने परिसर भयकंपीत होत असल्याचे हर्षवर्धन महागावकर यांनी सांगितले.

हर्षवर्धन महागावकर म्हणाले, ‘‘पहाटे कुत्र्यांच्या भुंकण्याने जाग आली. व्हरांड्यातील जाळीतून बाहेर पाहिले असता टस्कर बिनधास्तपणे झाडावरील फणस फस्त करीत होता. कुत्री भुंकत असतानाही बाहेरील लाईट लावला. तरीही तो हलला नाही. त्याने झाडावरील तीन-चार फणस फस्त केले. लोखंडी डबे वाजवल्यावर व जोराच्या आवाजाने तो थोडासा मागे सरकला व अंधारामध्ये गेला. काही वेळाने तो परत फिरला व घराजवळ आला. त्याने परत फणसावर ताव मारायला सुरवात केली. तो हलण्याची चिन्हे दिसेनात. त्यामुळे फटाके वाजवून त्याला अंगणातून हुसकावून लावले. तो काही काळ मेसकाठीच्या बनात गेला. तेथे दहा-पंधरा कोवळे कोंब फस्त केले. तेथून तो आजरा-आंबोली रस्ता ओलांडून जंगलाच्या दिशेने निघाला. यावेळी चारचाकी गाड्यांचे विजेचे झोत अंगावर पडल्यावर तो बिचकला आणि तेथेच थांबला. साहजिकच यावेळी दहा-पंधरा मिनिटे रस्त्यावरील गाड्याही थांबून राहिल्या. गेली अनेक वर्षे हत्तीचा या परिसरात वावर असून तो पहाटेच आमच्या फार्म हाऊसवर हजेरी लावतो. त्याचे येणे सरावाचे झाले असून तो आमच्यासाठी ‘मॉर्निंग बेल’च ठरत आहे.’’ 

मसोली फाटा ते चाळोबा देवस्थानजवळ हत्ती सतत रस्त्यावर उतरत असतो. या परिसरात वन विभागाने हत्ती प्रवणक्षेत्राचे फलक लावण्याची गरज आहे. या मार्गावरून पर्यटक ये-जा करतात. फलकामुळे चालकास वाहने सावकाश व सावधपणे चालवण्याची सूचना मिळेल.
- हर्षवर्धन महागावकर,
वेळवट्टी.

Web Title: Kolhapur News Elephant in Ajara area

टॅग्स