दिस उजाडतो नवी काळजी घेऊन

दिस उजाडतो नवी काळजी घेऊन

चंदगड - रविवारचा दिवस मतदानाचा. साहजिकच शेत शिवारात हा चर्चेचा विषय. सायंकाळी सातलाच न्हावेलीच्या शिवारात दत्तू सुभेदार, अशोक पेडणेकर, जानबा पेडणेकर, बाबू गावडे आदींचा शेकोटीभोवती घोळका जमलेला. महिनाभर हत्तीचा त्रास नसला तरी शेतात गवे येऊ नयेत, म्हणून मध्ये मध्ये हाकाटी देत, डबे वाजवत राजकारणाचा फड रंगला होता. आज निवडणुकीचा ताण घालवायचा सोडून इतक्‍या लवकर शिवारात कसे? विचारताच दत्तू सुभेदार उत्तरले.

‘‘दिस उजाडतो, तोच नवी काळजी घेऊन. धिंधरू पडायला शेतात येऊस पायजे. जरा आळोस केला की हिकडी हुत्याचं नव्हतं झालंच म्हणून समजा.’’ तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील सुमारे चाळीस गावांची व्यथा सुभेदार मांडत होते. लागण केल्यापासून उसाची आणि त्यानंतर खरिपाच्या पिकांची रखवाली केली तरच उत्पन्नाची हमी. इथे नशिबावर हवाला ठेवून राहिला तो संपला, अशी स्थिती आहे.  

जांबरे-उमगावचा परिसर म्हणजे जंगलाने व्यापलेला भाग. पश्‍चिमेला सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द. घनदाट जंगलाने दोन जिल्ह्यांची हद्द स्वतंत्र केलेली. या जंगलाच्या कुशीत जांबरे प्रकल्प साकारला आहे. दोन वर्षांपासून जांबरे प्रकल्पाने बारमाही मुबलक पाण्याची सोय झाली असली, तरी तत्पूर्वीपासूनच विहिरीवर आधारित शेती फुलवलेली. जंगलाच्या पोटातील शेत म्हणजे वन्य प्राण्यांसाठी खुराकच. शेतात दोनशे-तीनशे मीटरवर प्रत्येकाचे रखवालीचे मचाण आहे. रात्रभर झोप ही नाहीच. केवळ डुलकी घ्यायची. कुत्रे भुंकायला लागले की डबा वाजवायचा. एकाचा डबा वाजला की शिवारभर डब्यांचा गलका घुमायला लागतो.. दिवस उजाडला की शेतात फिरून जनावरे फिरली तर नाहीत ना, याचा पुन्हा अंदाज घेतला जातो. या भागात गव्यांचा उपद्रव आहे. 

वन विभागाकडून मिळणारी भरपाई अत्यंत तोकडी असल्याने अनेक जण नुकसान होऊनही भरपाईची मागणी करीत नसल्याची स्थिती आहे. शासनाला प्राण्यांचा बंदोबस्त करता येत नसेल तर किमान ही भरपाईची रक्कम वाढवून द्यावी. 
- दत्तू सुभेदार,
शेतकरी, न्हावेली
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com