..टस्‍कर आला, परिसर धास्‍तावला!

..टस्‍कर आला, परिसर धास्‍तावला!

कोल्हापूर - दिवस मावळला, की पडसाळीकडे जाणाऱ्या मानवाड, भैरीचा धनगरवाडा, रस्त्यावरून वन विभागाची जीप फिरू लागते. जीपवर एक स्पिकर आणि ‘हत्तीपासून सावध रहा. रात्री शेतावर राखणीसाठी जाऊ नका.’ असे माईकवरून पुकारत जीप वाड्या-वस्तीवर जाऊ लागते. शेतावर गेलेल्यांची परतीची घाई सुरू होते. या रस्त्यावरून रात्री उशिरा कामावरून येणाऱ्यांच्या मोटारसायकलींना तर मोठी गती येते. 

रात्री नऊच्या सुमारास सगळा परिसर चिडीचूप होतो. एरव्ही शेतात राखणीला गेलेल्यांच्या बॅटरीचे झोत दुरूनही लुकलुकताना दिसतात, पण आता हत्तीच्या भीतीने शेतातही कोणी राखणीला नसल्याने या रस्त्यावरचा अंधार अधिकच गडद जाणवतो.

  •  वन विभागाची गस्त
  •  परिसरात प्रथमच हत्तीचे आगमन
  •  राखणीला न जाण्याचे आवाहन
  •  रात्री नऊच्या सुमारास परिसर चिडीचूप
  •  पिकांच्‍या नुकसानीने शेतकरी चिंतेत
  •  परिसर टस्‍करच्‍या दहशतीखाली
  •  गव्‍यानंतर आता हत्तीचे दर्शन

दोन दिवस हत्तीच्या वावरामुळे पन्हाळा तालुक्‍यातील पिसात्री, मानवाड, भैरीचा धनगरवाडा, ढवणाचा धनगरवाडा, गुरववाडी, कोलिक परिसरात असे गूढ भीतीचे वातावरण आहे. हा भाग जंगली. रोज या भागात गव्याचे कळप पण दोन वर्षांत हत्तीही या परिसरात येऊ लागला आणि आपल्या मस्तीत, ऐटीत एकट्या फिरणाऱ्या (टस्कर) या हत्तीचा धसका मात्र सर्वांनी घेतला. 

चक्क अंगणातच
भैरीचा धनगरवाड्यावर खोडके परिवाराची चारच घरे. त्यातच काल रात्री वीजपुरवठा खंडित झालेला. या घरातील वीस पंचवीस जण हत्तीच्या भीतीने घाबरलेले. रात्री बारानंतर ते झोपी गेले. एक वाजता त्यांच्या अंगणातले कुत्रे जोरजोरात भुंकू लागले आणि जणू बोडके यांनी दरवाजा किलकिला करून बाहेर बघितले तर अंगणात चक्‍क हत्ती उभा. त्यांनी त्यावर बॅटरीचा झोत टाकला आणि दार बंद करून ते व त्यांचे कुटुंबीय दाराजवळ उभे राहिले. बरोबर अर्धातास काहीही हालचाल न करता हत्ती अंगणात उभा राहिला. १ वाजून ३५ मिनिटांनी जवळच्याच उसाच्या शेतात गेला. तेथून पुढे पुन्हा जंगलात गेला. आज सकाळी सहा वाजता वनखात्याचे चार कर्मचारी आले. हत्तीच्या पायाचे मोठे ठसे पाहून ते ही हबकून गेले...

परिसरातले शेवटचे गाव म्हणजे पडसाळी (ता. पन्हाळा) आणि पडसाळीतून खाली उतरलं की थेट रत्नागिरी जिल्हा पडसाळीकडे जाताना एका बाजूला हिरवागार ऊस, खळखळत वाहणारी जांभळी नदी व दुसऱ्या बाजूला दाट झाडीने वेढलेला डोंगर. त्यामुळे दिवसा हा परिसर खूप निसर्गरम्य वाटतो. रात्री मात्र गवे, भेकर या प्राण्यांच्या वावरामुळे अंगावर येतो. हत्तीने नेमका हा परिसर त्याच्या वावरासाठी निवडला आहे. कारण दिवसभर त्याला दडायला जंगल आहे. आणि रात्रभर खायला ऊस, मका आणि पाण्यासाठी जांभळी नदी आहे. 

मंगळवारी रात्री पहिल्यांदा हत्ती मानवाड फॉरेस्ट चौकीपासून पुढे असलेल्या भैरी धनगरवाड्याजवळ आला. त्यावेळी शेतात गव्याच्या राखणीसाठी शेतकरी मचाणावर होते, पण लक्ष्मण घुरके या शेतकऱ्याने उसात थोडी खुसफूस जाणवल्याने तिकडे बॅटरीचा झोत टाकला आणि काही अंतरावर चक्‍क सुळेदार हत्ती पाहून तो उलट्या बाजूने पळतच सुटला व हत्ती आला असे ओरडू लागला.

आजूबाजूच्या शेतातले शेतकरीही सावध झाले. सगळे पटापट बाहेर पडले. मानवाड धनगरवाड्याजवळच्या मुख्य रस्त्यावर आले. तेथून दहा बारा जणांनी एका वेळी आपल्या बॅटरीचे झोत रस्त्याकडेच्या शेतातील हत्तीवर टाकले व भला मोठा सुळेदार हत्ती पाहून भेदरलेच. त्यांनी मोबाईलवरून वन विभागाच्या चौकशी संपर्क साधला. वन खात्याची जीप व चार कर्मचारी आले. त्यांनी पहिल्यांदा सर्वांना बॅटरीचे झोत बंद करायला लावले. तासाभराने हत्ती शेतातून रस्त्यावर आला व झाडीत निघून गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com