पहिल्या विमान प्रवासाचा आनंद!

राजेश मोरे
बुधवार, 18 एप्रिल 2018

कोल्हापूर - कोल्हापुरी भगवा फेटा, धोतर नेसलेले आजोबा, कासोटा पद्धतीने हिरवी साडी नेसलेल्या आजी, ठेवणीतील साडी नेसलेल्या कचरा वेचणाऱ्या दोन महिला, दिव्यांग अशा सर्वसामान्य घटकांतील १७ जणांनी आज कोल्हापूर-मुंबई विमानसेवेतील विमानातून प्रवासाचा आनंद घेतला.

कोल्हापूर - कोल्हापुरी भगवा फेटा, धोतर नेसलेले आजोबा, कासोटा पद्धतीने हिरवी साडी नेसलेल्या आजी, ठेवणीतील साडी नेसलेल्या कचरा वेचणाऱ्या दोन महिला, दिव्यांग अशा सर्वसामान्य घटकांतील १७ जणांनी आज कोल्हापूर-मुंबई विमानसेवेतील विमानातून प्रवासाचा आनंद घेतला. याबरोबरच कोल्हापूरच्या विकासाचे चाक वेग घेणार आहे. 

सहा वर्षे खंडित असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून एअर डेक्कनकडून सुरू झाली. मुंबई-कोल्हापूर पहिल्या फेरीतून खासदार धनंजय महाडिक उद्योजकांना घेऊन आले. विमानतळावर खासदार संभाजीराजे छत्रपती आणि अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक यांनी गुलाबपुष्प देऊन प्रवाशांचे स्वागत केले.

प्रगतीच्या दिशेने पडलेले हे कोल्हापूरचे दमदार पाऊल आहे. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा अखंड सुरू राहण्यासाठी प्रयत्न राहतील. निवडणुकीत दिलेले आश्‍वासन पूर्ण केले आहे. पर्यटन, औद्योगिकीकरणासह इतर प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या आहेत. 
-धनंजय महाडिक,
खासदार

कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. नाइट लँडिंग लवकरच सुरू होईल. कोल्हापूरच्या विकासासाठी विमानसेवा महत्त्वाची ठरणार आहे. आता लवकरच रखडलेल्या शिवाजी पुलाचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- संभाजीराजे छत्रपती,
खासदार

कोल्हापूर-मुंबई वुईथ डेक्कन एअर लाईन

मुंबई - ‘वेलकम टू डेक्‍कन एअर लाईन... मी मोनिका, एअर होस्टेस...’ हा आवाज कानावर पडला आणि पहिल्यांदाच विमान प्रवास करणाऱ्या चिखलीच्या आवबा मानेसह विमानातील पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीच समजेना. कोल्हापूर-मुंबई विमान प्रवास करण्याची संधी आज कचरा वेचणाऱ्या महिलेसह शेतकरी, दिव्यांगांना मिळाली. त्यांचे स्वागत एअर होस्टेसने केले आणि त्यांचा तासाभराचा प्रवास सुरू झाला.

विमानात बसण्याची मनात लागलेली उत्कंठा दुपारी साडेतीन वाजता प्रत्यक्षात आली. विमानाच्या पायऱ्या चढताना मात्र छातीत धडधडू लागले. कोल्हापूर ते मुंबई असा एक-सव्वा तासाचा प्रवास आज शेतकरी, कचरा विकणाऱ्यांनी आज अनुभवला. विमानाने झेप घेताच ‘आई गंऽऽ..’ असा आवाज अनेकांनी काढला. विमानात पहिल्यांदाच बसलेल्यांना सीट बेल्ट कसा बांधायचा हे कळत नव्हते. स्वतः एअर होस्टेसने हे सीट बेल्ट बांधले. विमानाने ‘टेक ॲफ’ केल्यावर अनेकांचे डोळे गरगरले. काहींनी धाडस करीत खिडकीतून पाहिले तर उंचीवर आल्याचे पाहून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

सांताक्रूझ विमानतळावर उतरल्यावर काहींनी सेल्फी तर काहींनी आकाशातील प्रवासाचे वर्णन सांगण्यास सुरुवात केली. बिग बी अमिताभ बच्चन यांचा टीव्हीवर पाहणारा बंगला प्रत्यक्षात पाहण्यासाठी. बंगला बाहेरून पाहून सर्वच थक्कच झाले. 
आवबा माने (शेतकरी, प्रयाग चिखली) : विमान खेळण्यात पाहिले आणि खेळण्यापुरतेच वापरले. मुलगा खासदार धनंजय महाडिक यांचा कार्यकर्ता असल्यामुळे ही संधी मिळाली.

सत्तरीत पत्नीसह विमान प्रवास केल्याचा आनंद होतोय.
भारती कोळी (कचरा वेचणाऱ्या कर्मचारी) :
खासदार धनंजय महाडिक आणि ‘एकटी’ संस्थेच्या माध्यमातून विमानात बसण्याचा आज योग आला. विमान आकाश भिरभिरताना भीती वाटत होती. पण विमानात बसलेला आनंद मात्र औरच होता.

शीतल पोवार, सीमा पालकर (भागीरथी महिला संस्थेच्या कार्यकर्त्या) : विमान प्रवासाचे स्वप्न होते. पण ते कधी शक्‍य होईल असे वाटले नव्हते. अरुंधती महाडिक यांच्यासोबत सामाजिक कार्य करताना ही संधी मिळाली. विमान आकाशात झेपावले तेव्हा मात्र कधी मुंबई येते असे वाटले. लॅंडिंग झाले, तेव्हा मात्र आकाशातील अनुभव शब्दात सांगणारा नव्हता.

Web Title: Kolhapur News Enjoy the first plane trip