कोल्हापूरातील उद्योजकाची अडीच कोटींची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - सराफ व्यवसायात गुंतवणूक केलेल्या भागीदाराची तब्बल २ कोटी ४० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात एका दाम्पत्यावर गुन्हा नोंद झाला.

कोल्हापूर - सराफ व्यवसायात गुंतवणूक केलेल्या भागीदाराची तब्बल २ कोटी ४० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात एका दाम्पत्यावर गुन्हा नोंद झाला.

याबाबतची फिर्याद बांधकाम व्यावसायिक दिलीप रामचंद्र मोहिते (वय ५०, रा. नागाळा पार्क) यांनी न्यायालयात दिली. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा पोलिस ठाण्यात वर्ग झाला. खऱ्या सोन्याऐवजी एक ग्रॅम वजनाचे सोने दाखवून ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले असल्याचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी राजू इस्माईल बेग (वय ५०) आणि त्याची पत्नी फिरोझा बेग (४५, रा. खडे बझार, बेळगाव) यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे.  

श्री. साळुंखे यांनी दिलेली माहिती अशी, की दिलीप मोहिते बांधकाम व्यावसायिक आहेत. राजू बेग व त्याची पत्नी फिरोझा या दोघांचे कणकवली व बेळगाव येथे सराफी दुकान आहे. त्याने २००१ मध्ये जोसेफ बारदेस्कर यांच्या मध्यस्थीतून मोहिते यांची ओळख काढली. ओळख वाढवत त्याने मोहिते यांना सराफ व्यवसाय भागीदारीत सुरू 
करू. त्यात जास्त फायदा असल्याचे सांगितले. त्याला मोहिते यांनी संमती दिली. बेग याच्या कणकवली व बेळगाव येथील दुकानाचे नाव ‘गोल्ड म्युझियम’ आहे. त्याच नावाने भागीदारातील सराफ व्यवसाय करू, अशी गळ बेग याने घातली. त्याच नावाने सराफ व्यवसाय सुरू झाला. यात जोन बारदेस्कर यांनाही भागीदार करून घेण्यात आले.

दुकानासाठी राजारामपुरीतील जागा बेग याने निश्‍चित केली. दुकानाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी राजू बेग याच्याकडे देण्यात आली. त्यासाठी त्याला व्यवसायातून होणाऱ्या फायद्यापैकी १० टक्के कमिशन देण्याचे निश्‍चित झाले. त्यानंतर राजारामपुरीतील गाळ्यात गोल्ड म्युझियम नावाने दुकान सुरू झाले. 

दुकानातील सोने खरेदीसाठी मोहिते यांनी १४ ऑक्‍टोबर २००९ ला ८० लाख रुपये, १४ एप्रिल २०१० ला १ कोटी, १६ एप्रिल २०१० ला २० लाख, ९ मार्च २०११ ला १५ लाख आणि १४ ऑगस्ट २०११ ला २५ लाख रुपये दिले. त्यातून बेग याने सोने खरेदी करून ते कणकवली व बेळगाव येथील स्वतःच्या दुकानात ठेवले; मात्र व्यवसायाच्या गडबडीत मोहिते यांना दुकानाकडे लक्ष देता आले नाही. ते व्यवसायाबाबत बेग याच्याकडे फोनवरून विचारणा करत होते. त्यावेळी व्यवसाय ठीक आहे, ग्राहकांची गर्दी आहे.

दुकानाचे दप्तर तपासणीसाठी लेखापरीक्षकांकडे पाठवले असल्याचे तो त्यांना सांगत होता. योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे तिघांही भागीदारांचे बिनसले. अखेर हे दुकान ३ ऑगस्ट २०१५ ला बंद करण्यात आले. याबाबत मोहिते यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेबाबत बेग यांच्याकडे वारंवार विचारणा केली; पण गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळत नसल्याचे मोहिते यांच्या लक्षात आले. त्यांनी ११ एप्रिल २०१७ ला याबाबतची तक्रार पोलिस अधीक्षक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे केली; मात्र तेथून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

अखेर त्यांनी १४ ऑक्‍टोबर २००९ ते १३ सप्टेंबर २०१७ या कालावधीत २ कोटी ४० लाखांची आपली फसवणूक झाल्याची फिर्याद न्यायालयात दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार राजारामपुरी पोलिस ठाण्यात हा गुन्हा वर्ग झाला. त्यानुसार राजू बेग व त्याची पत्नी फिरोझा या दोघांवर कलम ४०३, ४०६, ४१८, ४२०, ४६७, ४६८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचेही साळुंखे यांनी सांगितले.