प्रदर्शन पाहण्यास झुंबड; आज शेवट

कोल्हापूर - ‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाला बुधवारी झालेली गर्दी.
कोल्हापूर - ‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाला बुधवारी झालेली गर्दी.

कोल्हापूर - ‘सकाळ’च्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वारसास्थळ पेंटिंग आणि दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शन पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची झुंबड उडाली आहे. आज दिवसभरात अनेक शाळांनीही प्रदर्शनाला हजेरी लावली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर कलादालनात हे प्रदर्शन भरले असून, ते उद्या (गुरुवारी) सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत सर्वांसाठी खुले असेल. 

चित्रकलेतील ‘कोल्हापूर स्कूल’ची परंपरा शतकोत्तर हीरकमहोत्सवी आहे. या परंपरेत अनेक कलारत्न निर्माण झाले आणि त्यांच्या कलाकृतींनी जगाला भुरळ घातली. ‘सकाळ’ने ‘चला, मातीचा वारसा जपूया’ ही मोहीम यंदाच्या पर्यावरणदिनी जाहीर केली आणि त्याला समाजातील सर्वच घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हीच मोहीम पुढे नेताना आता शहरातील चित्रकारही पुढे सरसावले आणि त्यांनी तीसहून अधिक वारसास्थळांच्या कलाकृती उत्स्फूर्तपणे साकारल्या. जलरंगातील या कलाकृतींचा प्रदर्शनात समावेश असून त्या साऱ्यांनाच भुरळ घालत आहेत. 
ज्येष्ठ संग्राहक रवींद्र उबेरॉय, डॉ. यशोधरा उबेरॉय यांच्या संग्रहातील दुर्मीळ वस्तूंचाही प्रदर्शनात समावेश आहे.

कोल्हापूरच्या आजवरच्या वाटचालीची त्या साक्षीदार आहेत. १९४९ चा टाईपरायटर (ऑलंपिया - पश्‍चिम जर्मनी), एचएमव्ही - ७८ आरपीएम ग्रामोफोन (मॉडेल १०२ - १९३६), चंदनाची पेटी (१९५२), फिलिप्स पाच इंची स्पूल टेपरेकॉर्डर (हॉलंड), एनसाईन बॉक्‍स कॅमेरा - १२० रोलफिल्म (१९३८), कोडॅक - बेलोटाईप- १२० रोलफिल्म (१९५६), प्रभाकर पितळी कंदील - औंध स्टेट (१९४४), प्रायमस स्टोव्ह - स्वीडन (१९४५), टेलिग्राफ मशीन (१९६३), अखंड लाकडात कोरलेला गणपती (१९३१), १९६१ चा मायक्रोफोन (पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोल्हापुरातील सभेसाठी हा मायक्रोफोन वापरला होता.)

सायकलचा रॉकेल दिवा (१९५३), रेल्वे सिग्नल टॉर्च (१९३५), मातीचा गेळा (रेल्वे प्रवासासाठी इतर सामानाप्रमाणे पूर्वी अत्यावश्‍यक असणारी वस्तू), माळकर आणि कंपनीचा एक किलो पेढ्यासाठी दिला जाणारा लाकडी डबा (१९५४), फिरंगी २८ इंची तलवार, अंकुश (हत्तींना नियंत्रित करण्यासाठी वापरले जाणारे शस्त्र, १९३९), (कै.) चंद्रोबा गोविंदराव नरके यांचे १९७२ चे सावकारी व ड्रायव्हिंग लायसेन्स, १८९२ सालची भाज्या ठेवण्यासाठी केलेली वेताची टोपली (१८९२) आदी चाळीसहून अधिक दुर्मीळ वस्तूंचा खजिनाच प्रदर्शनात अनुभवायला मिळतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com