गारगोटीत कडकडीत बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

गारगोटी - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे यासह शेतीमालास हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचा सर्वत्र संप सुरु आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी भुदरगड तालुक्‍यातील अनेक गावांनी बंद पाळला. व्यापारी, उद्योजक, सहकारी संस्थासह विविध घटकांनी त्याला प्रतिसाद दिला. तालुक्‍यात गारगोटीसह कडगाव, पिंपळगाव, दारवाड, गावांनी उत्स्फूर्त बंद पाळला. 

गारगोटी - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे यासह शेतीमालास हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचा सर्वत्र संप सुरु आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी भुदरगड तालुक्‍यातील अनेक गावांनी बंद पाळला. व्यापारी, उद्योजक, सहकारी संस्थासह विविध घटकांनी त्याला प्रतिसाद दिला. तालुक्‍यात गारगोटीसह कडगाव, पिंपळगाव, दारवाड, गावांनी उत्स्फूर्त बंद पाळला. 

गारगोटीतील एका पेट्रोल पंपावरील किरकोळ बाचाबाची वगळता तालुक्‍यात शांततेत बंद पार पडला.'गोकुळ' दूध संघाने आंदोलनास पाठिंबा देऊन आज दूध संकलन न करण्याचे जाहीर केले. यामुळे गावागावातील दूध संस्थांनी संकलन केले नाही. तालुक्‍याचे ठिकाण व मुख्य बाजारपेठ असलेल्या गारगोटीत शांततेत शंभर टक्के कडकडीत बंद पाळला. 

गारगोटी बसस्थानकावरून सकाळी एस. टी. सेवा सुरु होती. ही माहिती मिळताच शेतकरी संघटना व शिवसेना कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखली. येथे आंदोलनकर्त्यांनी निदर्शने केली. अधिकाऱ्यांना विनंती करून एस. टी. सेवा बंद केली. 

तहसील कचेरीसमोरील भुदरगड तालुका शेतकरी मंचचे ठिय्या आंदोलन सुरूच राहिले. ठिय्या आंदोलनास बार असोसिएशच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. 

आंदोलनास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडितराव केणे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, तालुका संघाचे अध्यक्ष प्रा. बाळ देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अर्जुन आबिटकर, सभापती सरिता वरंडेकर, उपसभापती अजित देसाई, सदस्या स्नेहल परीट, सुनील निंबाळकर, संग्रामसिंह देसाई, शिवाजीराव देसाई, जयवंत गोरे, शरद मोरे, कोंडीबा जठार आदी प्रमुख नेत्यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. या वेळी कॉम्रेड सम्राट मोरे,राजू काझी,रवी देसाई, तानाजी देसाई, सचिन देसाई,अविनाश शिंदे, राजेंद्र देसाई, थॉमस डिसोजा, सुभाष देसाई, व्ही. जे. कदम, किशोर आबिटकर आदी उपस्थित होते. 

मुदाळतिट्टयावर बंद 
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी,उत्पादन खर्चावार आधारित भाव आदी मागण्यांसाठी सुरु असलेल्या शेतकरी संपास पाठिंबा देणेसाठी मुदाळतिट्टा परिसरात बंद पाळण्यात आला.परिसरातील व्यावसायिक,विक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला.यामुळे वर्दळीचे ठिकाण असलेल्या मुदाळतिट्टा परिसरात दिवसभर शुकशुकाट होता.