जिल्ह्यात बंदमुळे शंभर कोटींची उलाढाल ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध प्रश्‍नांवर विविध पक्ष, संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे जिल्ह्यात सुमारे शंभर कोटींची उलाढाल ठप्प झाली. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे व्यापारी पेठ, गुजरीतील सराफ दुकानांसह राजारामपुरी, भाऊसिंगजी रोड, महाद्वार, पापाची तिकटी, पान लाईन, गंगावेश शहरातील प्रमुख रस्त्यावरील इतर व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून संपाला पाठिंबा दिला. जिल्ह्यातही या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याने ग्रामीण भागातही उलाढाल ठप्पच होती. 

दरम्यान, "गोकुळ'सह जिल्ह्यातील इतर दूध संघांचे मिळून सुमारे 17 लाख लिटर दूध संकलन बंद राहिले. बाजार समितीत दररोज सुमारे 20 हजार क्विंटल भाजीपाल्याचे सौदे होतात. तेही झाले नाहीत. गुजरीत रोजची उलाढाल किमान 15 ते 20 कोटी रुपयांची होते, इतर छोटे-मोठ्या व्यापाऱ्यांची मिळून किमान 50 कोटींची उलाढाल ठप्प राहिली. 

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी, यासाठी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शिवसेना, कॉंग्रेस, किसान सभा, सिटू संघटना आदींनी पाठिंबा दिला होता. 

आज सकाळपासून काही प्रमुख मार्गावरील व्यवहार ठप्प होते. शिवसेनेचा पाठिंबा असल्याने सकाळी दबकत दबकत उघडलेली दुकाने अकरानंतर बंद झाली. बंदमध्ये एसटी, केएमटी व काही प्रमाणात रिक्षा वाहतूक सुरू राहिली. मात्र, ग्रामीण भागात एसटीच्या गाड्याही रोखून धरल्या. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने शहराकडे ग्रामीण भागातून येणारा शेतीमालही शहरात आला नाही. 
पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापडाची बाजारपेठ असलेल्या गांधीनगरमध्येही सकाळपासून दुपारपर्यंत व्यवहार बंद होते. सायंकाळनंतर शहर व परिसरातील काही व्यवहार सुरू झाले; पण त्यांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला नाही. 

उलाढाल ठप्प 
दूध संकलन - 17 लाख लिटर - 10 कोटी 
भाजीपाला - 20 हजार क्विंटल - 2 कोटी 
सराफ कट्टा - 15 ते 20 कोटी 
कापड व इतर छोटे व्यापार मिळून - 40 ते 45 कोटी 
इतर - 5 ते 6 कोटी रुपये