संपाने बदलली पाहुणचाराची पद्धत

राजकुमार चौगुले 
गुरुवार, 8 जून 2017

कोल्हापूर - गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील दूध संकलनावर परिणाम झाला आहे. ज्या गावांनी या संपात सक्रिय सहभाग घेतला आहे, त्या गावांतील नागरिकांना दुधाचे काय करावे ही चिंता भेडसावत आहे. दूध शिल्लक असल्याने प्रत्येक घरात बासुंदी आणि खव्याची रेलचेल दिसून येत आहे. घरी कोणीही पाहुणा गेला तर चहा विचारण्याऐवजी दूध पिणार? बासुंदी घेणार की खवा खाणार अशी विनंतीच प्रत्येकाला करण्यात येत आहे. पाहुण्याला आल्या आल्या चहा विचारण्याऐवजी हेच प्रश्‍न विचारले जाऊ लागले आहेत.

कोल्हापूर - गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील दूध संकलनावर परिणाम झाला आहे. ज्या गावांनी या संपात सक्रिय सहभाग घेतला आहे, त्या गावांतील नागरिकांना दुधाचे काय करावे ही चिंता भेडसावत आहे. दूध शिल्लक असल्याने प्रत्येक घरात बासुंदी आणि खव्याची रेलचेल दिसून येत आहे. घरी कोणीही पाहुणा गेला तर चहा विचारण्याऐवजी दूध पिणार? बासुंदी घेणार की खवा खाणार अशी विनंतीच प्रत्येकाला करण्यात येत आहे. पाहुण्याला आल्या आल्या चहा विचारण्याऐवजी हेच प्रश्‍न विचारले जाऊ लागले आहेत. संपाचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत असला तरी पाहुण्यांच्या पाहुणचाराची पद्धत मात्र गेल्या चार दिवसांत बदलत असल्याचे चित्र दिसत आहे.  

पश्‍चिम महाराष्ट्रात दिवसाला दोन ते तीन हजार लिटर दूध संकलन असणारी शेकडो गावे आहेत. अनेक गावांत तर हा मुख्य व्यवसाय आहे. शेतकरी संपात उतरल्यानंतर याचा तातडीचा परिणाम दूध व्यवसायावर झाला. पश्‍चिमेकडील गावांनी एकजुटीने संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ पातळीवर संपाबाबत निर्णय होत नसल्याने अजूनही काही गावांतून दुधाचे संकलन ठप्प आहे. यामुळे दूध संघाकडे जाण्याचा ओघ कमी झाला आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातच दररोज एक लाख लिटरहून अधिक दूध शिल्लक राहात आहे. 

दूध जरी संघाला नाही घातले तरी धार ही काढावीच लागते. धार न काढल्यास पुढील सर्व वेळापत्रक विस्कळित होते. पण धारा काढल्या काढल्या दूध संस्थेला नेण्याची सवय असणाऱ्या दुग्ध व्यवसायिकांना मात्र शिल्लक दूध ही एक समस्या होऊन बसली आहे. यामुळेच बासुंदी व दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे.

दूध संकलन बंद असल्याने दररोज दहा ते पंधरा लिटर दुधाचे काय करायचे हा प्रश्‍न आहे. यामुळे शेजारील गावांत असणाऱ्या पाहुण्यांना आम्ही दूध देत आहोत. दूध फेकण्यापेक्षा जे इतरवेळी विकत आणतात, त्यांनाच दूध पोच करत आहोत. 
- मीना पाटील, दुग्ध व्यावसायिक, चिखली, जि. कोल्हापूर