आत्मविश्‍वास देणारे वडीलच आयडॉल

अमोल सावंत, अमृता जोशी
रविवार, 18 जून 2017

‘सकाळ’ने घेतलेल्या सर्वेक्षणात तरुणाई झाली व्यक्‍त

‘सकाळ’ने घेतलेल्या सर्वेक्षणात तरुणाई झाली व्यक्‍त

वडिलांचे कुटुंबातील वर्तन, अनेक कटू-गोड प्रसंगात दिसणारा त्यांचा आत्मविश्‍वास, कुटुंबातील अन्‌ समाजातील दर्जा, वडील हेच माझ्यासाठी ‘आयडॉल’ आहेत, अशा प्रतिक्रिया युवक-युवतींनी उद्या (ता. १८) जगभरात साजरा होणाऱ्या फादर डे निमित्त ‘सकाळ’ने घेतलेल्या सर्वेक्षणात व्यक्त केल्या. अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू जिम व्हालवानो म्हणतो, My father gave me the greatest gift anyone could give another person, he believed in me. वडील माझ्यावर विश्‍वास ठेवतात, ही ऊर्जाच अनेकांना आयुष्यात उभे करते. म्हणूनच फादर डे निमित्त जगभरात वडिलांप्रती अपार कृतज्ञता व्यक्त केली जाते. 

कोणत्याही गोष्टीची निवड करण्यापूर्वी तुम्ही वडिलांशी संवाद साधता का? 
या प्रश्‍नावर ‘होय’ असे ७२.९ टक्के तर १४.६ टक्के जणांनी नाही, असे सांगितले. १०.४ टक्के सांगता येत नाही तर २.१ टक्के जणांनी महत्त्वाच्या गोष्टीसाठी संवाद साधतो, अशी नोंद केली. 

एखादा निर्णय घेताना वडील चुकले तर ती चूक तुम्ही वडिलांच्या निदर्शनास आणून देता का?
यावर ५६.३ टक्के होय, २१.१ नाही, १४.६ टक्के सांगता येत नाही तर २.१ टक्के जणांनी असं कधी होत नाही म्हणून मत नोंदविले. 

वडिलांनी तुमचा एखादा निर्णय मान्य केला नाही तर काय करता?
या प्रश्‍नावर चर्चा करून मुद्दा पटवून देतो, असे ६७.४ टक्के जणांनी सांगितले. १०.९ टक्के मत हे न सांगता परस्पर निर्णय घेतो, २.२ टक्के परिस्थितीनुसार तर ६.५ टक्के जणांनी दुर्लक्ष करतो, अशी नोंद केली. १०.९ टक्के मते ही न सांगता परस्पर निर्णय घेतो, असे सांगितले. 

वडिलांसाठी काय करावेसे वाटते? 
असे विचारल्यानंतर ४५.८ टक्के जणांनी शक्‍य त्या प्रत्येक गोष्टीत त्यांना मदत करायला आवडेल, असे सांगितले; तर २०.८ टक्के हे म्हातारपणात त्यांना आधार बनणे, १२.६ टक्केंनी खूप शिकावेसे वाटते, १६.७ टक्केंनी काहीतरी वेगळे करता येईल, असे सांगितले. 

आपण स्वत: बनविलेली एखादी वस्तू वडिलांना गिफ्ट केली आहे का?
यावर ५६.३ टक्के जणांनी होय, तर ४३.८ टक्केंनी नाही, असे मत व्यक्त केले. 

वडिलांच्या भावनांचा तुम्ही कधी विचार करता का? 
या प्रश्‍नावर ९७.९ टक्के जणांनी होय, असे सांगितले. नाही असे मत नोंदविणाऱ्यांची संख्या फक्त २.१ टक्के आहे. 

काहीतरी देण्याची भूमिका
वडिलांचा प्रभाव हा जीवनावर असला तरी वडिलांविषयी एखाद्याच्या मनात वेगवेगळी प्रतिमा असू शकते. वडिलांची कोणती गोष्ट आवडते, या प्रश्‍नातून वागणूक, मित्राची भूमिका, आधार, आदर असे अनेक घटक पुढे आले.  काही झाले तरी वडिलांविषयी आदरयुक्त भीती ही प्रत्येकाच्या मनात असतेच. म्हणूनच सर्वेक्षणादरम्यान अनेक चांगल्या गोष्टीही पुढे आल्या. आयुष्यात निर्णयाला फार महत्त्व असते. बरोबर ठरला तर आयुष्य घडते अन्‌ चुकला तर मात्र परिणाम भोगावे लागतात, यासाठी वडिलांनी तुमचा एखादा निर्णय मान्य केला नाही, या प्रश्‍नावर मुद्दा पटवून देतो, असं सांगणाऱ्यांची टक्केवारी ही जास्त होती, हे महत्त्वाचे. वडील आपल्यासाठी इतके काही करतात, ही जाणीव अनेकांना कार्यप्रवण करते. तेव्हा सर्वेक्षणादरम्यान वडील नेहमी आपल्याला सतत साथ देत राहतात. म्हणून आपणही काहीतरी वडिलांना दिले पाहिजे, असे मत अनेकांनी प्रामाणिकपणे नोंदविले. कुटुंब व्यवस्था टिकून राहावी, असे प्रत्येकाला वाटते. वडील तर कुटुंबाचा कणा असतो. तो ही एक माणूस असतो. म्हणून कुटुंब व्यवस्थेत अजूनही चांगुलपणा टिकून आहे, हे सिद्ध झाले.

खरंच तो बाप असतो. न थकता कुटुंबासाठी धडपडत असतो. जगण्याची प्रेरणा तो देतो. स्वत: मात्र अनेक गोष्टींचा त्याग करत कुटुंबातील प्रत्येकाला आयुष्यात उभे करतो. इतकं सगळं काही करून स्वत: मात्र तटस्थ राहतो; म्हणूनच बापाचा हा अदृश्‍य प्रभाव अनेकांच्या जीवनावर असतो. यासाठी फादर डे निमित्त ‘सकाळ’ने सर्वेक्षणाद्वारे खास करून नव्या पिढीचे शिलेदार असणाऱ्या युवक-युवतींना बोलते केले. स्वत:च्या बापाविषयी त्यांना नेमके काय वाटते, ते जाणून घेतले. तेव्हा अनेकांच्या संवादातून बाप ही आपली प्रेरणा असून तो आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक असल्याचे अधोरेखित झाले.