एक बाप हतबल होतो तेव्हा...

एक बाप हतबल होतो तेव्हा...

बंदीजनांच्या बापाचे वास्तव - कारागृहात भेटताना व्यक्त होते अगतिकता

कोल्हापूर - तुरुंगातील कैद्यांच्या भेटीचा दिवस असतो. भेट सकाळी दहानंतर; पण एक काका सकाळी आठलाच तुरुंगासमोरच्या झाडाखाली येऊन बसलेले असतात. वय ७०, हातात एक पिशवी, पिशवीत पाण्याची बाटली, दाढीचे खूट वाढलेले. नजर तुरुंगाच्या दरवाजावर रोखलेली. भेटीची वेळ सुरू झाली की, धावत दरवाजाकडे येतात. आत तुरुंगात गुन्ह्यात अडकलेला त्यांचा मुलगा असतो. ते भेटीच्या दालनात समोरासमोर येतात.

या काकांच्या एका डोळ्यात मुलाच्या कृत्याबद्दलचा राग आणि दुसऱ्या डोळ्यात आपल्या मुलाच्या वाट्याला आलेल्या तुरुंगवासाबद्दल पाणी असते. मुलाबरोबर खूप बोलायचे म्हणून ते आलेले असतात; पण तुटक तुटक बोलतात आणि भेटीची वेळ संपली की, दहा वेळा मुलाकडे परत फिरून बघत बघत तुरुंगाबाहेर पडतात.

कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके तुरुंगातील कैद्यांच्या बापाची स्थिती काय असते ते सांगत होते.

अशीच स्थिती पोलिस ठाण्यात अटक असलेल्या आरोपींच्या बापांची. मुलगा कळत न कळत गुन्ह्यात सापडलेला असतो. वृत्तपत्रात त्याच्या नावाचा गाजावाजा झालेला असतो. दुसऱ्या दिवशी कधी एकटा, तरी कधी कोणाची तरी ओळख घेऊन बाप पोलिस ठाण्यात येतो. एका कोपऱ्यात निमूटपणे बराच वेळ उभा असतो. मुलगा समोर पोलिस कोठडीत दिसत असतो. ते पाहून हा बाप अर्धमेला झालेला असतो.

या पोलिसाला नमस्कार कर, त्या पोलिसाला नमस्कार कर, असे करत तो इन्स्पेक्‍टरांच्या खोलीपर्यंत कसा तरी पोचतो आणि मुलाच्या कृत्यामुळे खजिल झालेला, हतबल झालेला हा बाप डोळे आणि जोडलेले हात, अशा अवस्थेत दयेची भिक मागत राहतो. पोलिस निरीक्षक अमृत देशमुख पोलिस कोठडीतील आरोपीच्या बापाची स्थिती काय असते, हे सांगत होते.
ही झाली दोन प्रातिनिधिक उदाहरणे; पण अनेक बापांच्या वाट्याला ही अवस्था आली आहे. 

झटक्‍यात दादा होण्याची हौस आणि वाईट संगत यामुळे अनेक तरुण गुन्हेगारीत अडकत आहेत. ते तर त्याचे परिणाम भोगत आहेत; पण त्यांचे बाप तोंड दाबून मुक्‍याचा मार अशा अवस्थेत प्रत्येक दिवस काढत आहेत. आपला लाकडा पप्पू गुन्हेगारी जाळ्यात कसा अडकला या प्रश्‍नाने ते पोखरून निघत आहेत. जामीन, कोर्ट कज्जा यासाठी पैसा उभा करता करता मेटाकुटीला आले आहेत. जाऊदे पोरगा तुरुंगात खितपत पडूदे, असं एक मन म्हणत असतं; पण दुसरे मन मुलाच्या नात्याने झुरत असते. त्यातून त्याची तगमग होत असते आणि अशा बापांचे दर्शन तुरुंगाच्या पोलिस ठाण्याच्या आणि वकिलांच्या दारात घडत असते.

कारागृह अधीक्षक शरद शेळके हे अशा अभागी बापाची अगतिकता रोज पाहत आहेत. ते म्हणाले, ‘‘बाप कठोर वाटत असतो; पण तुरुंगाच्या दारात मुलाला भेटायला आलेला बाप वर कठोर पण आतून पोखरलेला असतो. तो मानसिक गोंधळलेला असतो. मुलाबरोबर बोलताना रडत असतो. परत जाताना दहा वेळा हात करत असतो.’’

शिक्षा मात्र बाप भोगतो
पोलिस निरीक्षक अमृत देशमुख म्हणाले, ‘‘मुलगा बाहेर काय करतो ते बापाला माहीत नसते; पण मुलगा गैरकृत्यात अडकतो. त्यात बापाचा नक्की दोष असतो; पण बाप म्हणून तो पोलिस ठाण्यात येतो. गर्भगळीत झालेला असतो. रागाने मुलाला शिव्या घालत असतो आणि तो पुन्हा असं करणार नाही म्हणून आमच्यापुढे हातही जोडत असतो. तरुण मुलाने आपल्या बापांची ही अवस्था जाणून घेणे गरजेचे आहे. कारण गुन्हा मुले करतात आणि शिक्षा मात्र बाप कशी भोगत असतो, हे जर डोळे उघडून पाहिले, तर खूप विदारक चित्र असते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com