कोल्हापूरात पद्मा टाॅकिजजवळच्या जुन्या इमारतीस आग

कोल्हापूरात पद्मा टाॅकिजजवळच्या जुन्या इमारतीस आग

कोल्हापूर - लक्ष्मीपुरीतील पानलाईन परिसरातील अरविंद पिसे यांच्या इमारतीला आज सकाळी साडेसात वाजता आग लागली. त्यामध्ये सुमारे दहा लाखांचे प्रापंचिक तसेच पेंटिंग साहित्य जळून खाक झाले. महापालिका अग्निशमन यंत्रणेच्या सहा बंबांनी अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आणली. ​

दरम्यान, रविवार आठवडी बाजाराची मांडणी सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने गोंधळ उडाला. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सुमारे चाळीस वर्षांपूर्वीची ही इमारत असून, दळवीज्‌ आर्टस्‌चे विद्यार्थी सूरज शेलार, राम मेस्त्री, पंकज गवंडे, सिद्धेश साळसकर, गणेश राऊळ, कृष्णा म्हेतर, भूषण म्हापणकर राहतात. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास सूरज शेलार व राम मेस्त्री कामासाठी बाहेर गेले, तर अन्य सहकारी झोपले होते. पाठीमागील खोलीतून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे सिद्धेश साळसकरला दिसले. त्याने झोपलेल्या आपल्या सहकारी मित्रांना जागे केले.

लाईटच्या मीटरचा मेन स्विच बंद करून सर्वजण पळत बाहेर आले. काही मिनिटांत धुराचे रूपांतर आगीमध्ये झाले. चारही खोल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या घराच्या आजूबाजूला अगरबत्तीची दुकाने आहेत. आठवडा बाजारासाठी पहाटेपासून ग्रामीण भागातील शेतकरी भाजीपाला घेऊन आले होते. बाजार मांडायला सुरवात करणार इतक्‍यात हा प्रकार लक्षात आला. सर्वांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेस फोन करून बोलावून घेतले. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील पोलिसही तातडीने तेथे दाखल झाले.

अग्निशमन बंबासह विद्युत महावितरण कंपनीचे कर्मचारी आल्यानंतर या परिसरातील विद्युत प्रवाह बंद केला. अग्निशमन यंत्रणेच्या जवानांनी चारही बाजूंनी पाणी मारल्यामुळे आजूबाजूच्या दुकानांना आगीच्या झळा पोचल्या नाहीत.

इमारतीला दुसऱ्यांदा आग
लक्ष्मीपुरी परिसरातील ही जुनी, पण मजबूत इमारत आहे. लाकडी साहित्य मोठ्या प्रमाणात वापरले आहे. वीस वर्षांपूर्वी याच इमारतीला आग आगली होती; मात्र त्या वेळी किरकोळ नुकसान झाले होते.

बाजारात धांदल
जैन मंदिरापासूनच अनेक व्यापारी, ग्रामीण भागातील शेतकरी आपला भाजीपाला मांडून बसतात. सकाळी बाजाराची मांडामांड सुरू असतानाच आगीचा प्रकार घडला. त्यामुळे व्यापाऱ्यांची धांदल उडाली. भीतीने काही व्यापाऱ्यांनी भाजी तेथेच टाकून पलायन केले. या गोंधळात ग्रामीण भागातून भाजी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.

लाखमोलाच्या कलाकृती अन्‌ प्रमाणपत्रे डोळ्यासमोर जळाली

आम्ही कोकणातले कुडाळचे. घरं तशी साधीच मातीची. दळवीज्‌ आर्टस्‌मध्ये शिकायला आलो आणि आमची सारी शैक्षणिक प्रमाणपत्रं रूमवरच आणली.

गावाकडच्या घरापेक्षा रूमवर ती अधिक सुरक्षित राहतील, हा ठाम विश्‍वास. कॉलेजच्या असाईनमेंटस्‌, तयार केलेल्या दोन ते अडीच हजारांवर पेंटिंग्ज्‌ रूमवर होती. आजच्या घटनेने आमचा हा सारा मौलिक खजाना डोळ्यासमोर जळून खाक झाला, पण जीवित हानी झाली नाही. या दुर्घटनेतून आम्ही नक्कीच सावरलो आहे आणि नव्याने पुन्हा कामाला प्रारंभ करून यशोलौकिकाचे शिलेदार होऊन दाखवणार आहोत, असा दुर्दम्य आत्मविश्‍वास आज युवा चित्रकार राम मेस्त्री, सूरज शेलार, गणेश राऊळ, पंकज गवंडे, भूषण म्हापणकर, सिद्धेश साळस्कर, कृष्णा म्हेत्तर यांनी जागवला.   

चित्रकलेच्या अभिजात शिक्षणासाठी कोकणातून अनेक विद्यार्थी येथील कला संस्थांत येतात. एक तर आवड करिअरमध्ये बदलणारं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या काळातील कमी शुल्कात होणारं हे शिक्षण. राम सात वर्षांपूर्वी दळवीज्‌ आर्टस्‌मध्ये दाखल झाला. त्याच्या पाठोपाठ सूरजही आला. लक्ष्मीपुरीतील ही रूम म्हणजे कुडाळच्या विद्यार्थ्यांचं हक्काचं घर झालं. राम आणि सूरजचं शिक्षण पूर्ण होऊन आता ते प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करत आहेत. दोघांनाही राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. चित्रकलेबरोबरच लघुपटांच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक बक्षिसांची लयलूट केली आहे. गणेश, पंकज, भूषण, सिध्देश व कृष्णा यांचे सध्या शिक्षण सुरू आहे. मात्र, सध्या परीक्षेचा काळ सुरू असून, त्यांच्या साऱ्या तयार केलेल्या असाईनमेंट जळून खाक झाल्या आहेत. रामने एका कामासाठी तीस हजार रुपये कालच बॅगेत आणून ठेवले होते. या रकमेसह त्याचा लॅपटॉपही जळून खाक झाला. सर्वांनी मिळून आणलेली संगीत वाद्यही जळाली. घडलेला प्रकार सर्वांसाठीच अनपेक्षित होता. 

सर्वतोपरी सहकार्य
आजच्या या दुर्घटनेनंतर हे विद्यार्थी सावरले असले तरी त्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी विविध घटक पुढे सरसावले आहेत. विशेषतः ‘दळवीज्‌’च्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. आर्थिक आधाराबरोबरच या विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी आवश्‍यक ते सर्व सहकार्य केले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com