कोल्हापुरात अग्निशामक दलच असुरक्षित... 

सुधाकर काशीद
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - धोकादायक इमारत कोसळल्यावर बचावासाठी अग्निशामक दलाने धावून जाणे हे कर्तव्यच आहे, पण कधी तरी अग्निशामक दलाची इमारतच कोसळली तर?... होय तशीच परिस्थिती कोल्हापुरात आहे. कोल्हापूर महापालिका अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाची इमारतच दहा वर्षांपूर्वी धोकादायक म्हणून घोषित केली आहे, पण गावाला सुरक्षिततेचे सल्ला देणारे आणि आणिबाणीच्या प्रसंगी धावून जाणारे अग्निशामक दलाचे कर्मचारीच गेली दहा वर्षे धोकादायक इमारतीत आहेत. तेच स्वतः जीव मुठीत घेऊन कारभार करत आहेत. एवढेच नव्हे तर याच धोकादायक इमारतीत एक फायर फायटर, एक रुग्णवाहिका व एक शववाहिका थांबून आहे. 

ताराराणी चौकालगत व महापालिका विभागीय कार्यालयाला लागूनच अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाची तीन मजली इमारत आहे. इमारत 30 वर्षे जुनी आहे. या इमारतीतूनच अग्निशामक दलाचा सर्व कारभार चालतो. या ठिकाणी बिनतारी संदेश यंत्रणा, अन्य अग्निशामक केंद्रांशी हॉट लाईन, आपत्ती काळात वापरली जाणारी सर्व साधने, एक मोठा फायर फायटर, एक शववाहिका व एक रुग्णवाहिका आहे. तीन पाळीत कायम 20 ते 25 कर्मचारी याच ठिकाणी असतात. 

याच इमारतीत अग्निशामक दल प्रमुख व अन्य दोन कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय आहे. आठ-दहा वर्षांपूर्वी या इमारतीत ओल जाणवू लागली. वरच्या निवासस्थानातील पाणी थेट खाली झिरपू लागले. सतत ओल असल्यामुळे भिंतीचे, छताचे ढपले पडू लागले. काही ठिकाणी ढपले पडल्यामुळे भिंतीच्या लोखंडी सळ्या दिसू लागल्या. भिंतीवर शेवाळांनी घर केले, बुरशीचे थर जमू लागले. 

इमारतीची ही अवस्था पाहून 2006 मध्ये महापालिकेनेच ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली. तातडीचा उपाय म्हणून फक्त अग्निशामक दल प्रमुख व इतर दोन कर्मचाऱ्यांना इमारतीतील वास्तव सोडण्यास सांगण्यात आले. त्यामुळे आता वरच्या मजल्यावर कोणी राहत नाही पण संपूर्ण इमारत धोकादायक अवस्थेत जैसे थे उभी आहे. कर्मचारी इमारतीत न बसता इमारतीबाहेर मारलेल्या एका छोट्या शेडखाली बसणे सुरक्षित मानत आहेत. 

इमारत दुरुस्त करावी, किंवा नवीन बांधावी म्हणून यापूर्वी अग्निशामक दल प्रमुखांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे, पण इमारत आहे तशीच आहे. कधीतरी ही इमारत खचणार, कलणार किंवा कोसळणार हे स्पष्ट आहे. पण असे काही तरी वाईट झाल्यानंतरच ""तातडीच्या हालचाली'' ही महापालिकेच्या कामाची पद्धत आहे. काल मुंबईत धोकादायक इमारत कोसळून 23 जण ठार झाल्यानंतर अन्य धोकादायक इमारतीतील रहिवाशांना तत्काळ बाहेर काढून त्या इमारती मोकळ्या करण्यास सुरवात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरातील धोकादायक इमारत आणि तीही चक्क अग्निशामक दलाचीच असल्याने हे विसंगतीचे उदाहरण ठरणार आहे. 

नियंत्रण कक्षाची इमारत धोकादायक जाहीर झाली आहे. इमारतीची डागडुजी व्हावी म्हणून वारंवार विभागीय कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. यापूर्वी पाहणीही केली गेली आहे. पण दहा वर्षे इमारत तशीच आहे. लवकरच नवी इमारत होईल किंवा आहे ती इमारत भक्कम केली जाईल,अशी अपेक्षा आहे. 
रणजित चिले, अग्निशामक दल प्रमुख 

Web Title: kolhapur news firebrigade