मासे स्वस्त झाल्याने कोल्हापूरकर झाले मत्स्याहारी

मासे स्वस्त झाल्याने कोल्हापूरकर झाले मत्स्याहारी

कोल्हापूर - बांगडा, सुरमई, पापलेट या माशांचे दर उतरल्याने घरोघरी मासे, असे चित्र आहे. समुद्रातील या माशांना खास चव असते; पण एरवी दर जादा असल्याने फार मागणी नसते. मात्र, काही दिवसांत समुद्री माशांची तुफान आवक व कमी दर यामुळे मासे बाजार फुल्ल आहे. विशेषतः सर्वसामान्यांपासून उच्च वर्गापर्यंत सर्वांच्या पसंतीस असलेल्या बांगड्यांची बाजारात अक्षरशः रेलचेल असल्याने सुरमई व पापलेटचे दरही कमी झाले आहेत. 

या महिन्यात माशांची आवक वाढलेलीच असते; पण यंदा तुलनेत आवक जंगी असल्याने मासेच मासे अशी परिस्थिती आहे. काहींच्या मते समुद्रातील नैसर्गिक घडामोडींमुळे मासे मोठ्या प्रमाणात वर येत आहेत. पण, येथील विक्रेत्यांच्या अनुभवानुसार अशी मोठी आवक साधारण डिसेंबरपर्यंत असतेच. मात्र, तुलनेत यंदा जास्त आहे.

कोल्हापुरात मटण, चिकन, मासे यांना श्रावण सोडला तर बारमाही मागणी असते. त्यातही मटण-चिकनला प्राधान्य असते. कोल्हापुरात कोकणातून येणारे मासे इतर शहरांच्या तुलनेत सर्वांत आधी येतात. कारण कोकण आणि कोल्हापूर अंतर कमी आहे. याशिवाय, परिसरातील नदी-तलावांतूनही मासेमारी होते. मासे खाणारे दर्दी ग्राहक कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात आहेत. पण, एरवीचा सुरमई, पापलेटचा दर सर्वसामान्यांना परवडत नाही. 

बांगडा १००, सुरमई ३५० किलो
काही दिवसांपासून बांगडा चक्क १०० ते १२० रुपये किलो, सुरमई ३०० ते ३५० रुपये किलोच्या आसपास व पापलेट ५०० ते ८०० रुपये (लहान-मोठा) किलोच्या दरम्यान मिळू लागला. हे मासे चवीला चांगले व विविध प्रकारांत करता येणारे असल्याने ग्राहकांची गर्दी वाढली. बांगडा तर अतिशय चवदार. मधला एक काटा व्यवस्थित काढला, की त्याच्यासारखा चवदार मासा नाही. असा मासा १०० रुपये किलोपर्यंत मिळू लागल्याने अक्षरशः झुंबड उडाली आहे.

बाजारात बांगडा मोठ्या प्रमाणात आला, की इतर माशांचे दर थोडेफार उतरतातच. बांगडा सर्व स्तरातील लोकांत आवडतो. त्याची तुफान आवक झाली आहे. अर्थातच, तुलनेत बाजारपेठेत मासेच मासे आहेत. येथे येणारे ८० टक्के मासे रत्नागिरी बंदरातील आहेत. या माशाला खूप चव असते. परदेशातही मासे निर्यात होतात. कोल्हापूर हे रत्नागिरीच्या जवळ आहे. त्यामुळे ताजा व चांगला मासा कोल्हापूरकरांना खाण्याची संधी आली आहे. कोल्हापूरकर ही संधी घेत असल्याने मासे बाजार हाउसफुल्ल आहे.
- प्रदीप घोटणे, मासे व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com