जुगार अड्यावर धाड टाकून हुपरीत पाचजणांना अटक

बाळासाहेब कांबळे
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नवरात्र उत्सव काळात जुगार अड्डे चालू केल्यास कडक कारवाई करण्याचा दम भरला आहे.

हुपरी (जि. कोल्हापूर) : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे हॉटेल गारवाच्या मागील बाजूस सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्यावर हुपरी पोलिसानी धाड टाकून जुगार खेळणार्‍या पाच जणांना अटक केली. यावेळी पोलिसानी रोख ३ हजार सातशे रुपये जप्त केले. शनिवारी (ता. २३) रात्रीच्या सुमारास पोलिसानी ही कारवाई केली.

अटक करण्‍यात आलेल्‍या संशयितांची नावे अशी, संजय मारुती माने (वय ૪५ रा. अंबाई नगर , रेंदाळ), अमर श्रीपाल कारंडे (वय ३० रा. लक्ष्मीपुरी भोई गल्ली, कोल्हापुर) , विशाल प्रकाश माने (वय ३२ रा. माने नगर, रेंदाळ), अजित सदाशिव बिचकर (वय ५० रा. यशवंत नगर, हुपरी) व प्रकाश विकास मेथे (वय ३८ रा. सुभाष चौक, हुपरी).

सहायक पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी नवरात्र उत्सव काळात जुगार अड्डे चालू केल्यास कडक कारवाई करण्याचा दम भरला आहे. तरी देखील काही ठिकाणी चोरुन तीन पानी जुगार अड्डे सुरु झाले आहेत. कारवाईच्या धसक्याने जुगार्‍यांनी आपला मोर्चा लगतच्या गोकुळ शिरगांव पोलिस ठाणे हद्दीतील सिल्व्हर झोन मध्ये वळवला आहे. या ठिकाणी तीन पानी जुगार अड्डे राजरोस सुरु असुन त्याकडे अर्थपुर्ण घडामोडीं मुळे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही या प्रकारांकडे कानाडोळा केल्याची चर्चा सुरु आहे.