कोल्हापूर बाजार समितीत पहिल्यांदाच बहरला फुलांचा बाजार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : मार्केट यार्डमध्ये फुलबाजार सुरू करण्याचे बाजार समितीचे स्वप्न अखेर आज पूर्ण झाले. फुलांच्या खरेदी -विक्रीची उलाढाल पाहता गेल्या पंधरा वर्षांपासून स्वतंत्र फुलबाजार असावा, असे स्वप्न पाहिले गेले ते आज सत्यात उतरले.

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : मार्केट यार्डमध्ये फुलबाजार सुरू करण्याचे बाजार समितीचे स्वप्न अखेर आज पूर्ण झाले. फुलांच्या खरेदी -विक्रीची उलाढाल पाहता गेल्या पंधरा वर्षांपासून स्वतंत्र फुलबाजार असावा, असे स्वप्न पाहिले गेले ते आज सत्यात उतरले.
शहराचा फूल मार्केट म्हणजे जेथे जागा मिळाली, तेथे विक्री असे अनेक वर्षांपासूनचे स्वरूप आहे. अंबाबाई मंदिराभोवती फूल व्यापार आहे, तो जसा दुकानात आहे, तसा रस्त्यावरही आहे. पूजेसाठी लागणारी दररोजची फुले ते सणासुदीच्या काळात जोतिबा रोडवर मोठी उलाढाल होते. व्यापाऱ्याला कोणत्याही प्रकारची शिस्त नाही. फुले विकणारे रस्त्याच्या बाजूला उभे असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होती. जे पारंपरिक दुकानदार आहेत, त्यांच्यासाठी सुटसुटीत अशी जागा आहे. पेव्हिंग ब्लॉक घालून त्यांना व्यापाराची संधी दिली आहे; मात्र ज्या महिलांचे हातावरचे पोट आहे, त्या रस्त्यावर फुलांची विक्री करतात. जोतिबा रोडबरोबर पाडळकर मार्केट, शिंगोशी मार्केट, राजारामपुरी मार्केट, सदरबाजारकडे जाणारा रस्ता, येथे फुलांची विक्री होते. हल्ली कोणत्याही कार्यक्रमाला बुके देण्याची फॅशन आहे. त्यामुळे आदित्य कॉर्नरसह प्रमुख चौकात स्टॉल नजरेस पडतात.
फूल उत्पादक तसेच विक्रेत्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून प्रयत्न सुरू होता. जिल्ह्यात फुलाला इतके मार्केट असूनही उत्पादकांना जागा मिळत नव्हती. गेल्या दसऱ्याला एकाने झेंडू लावला म्हणून दूसऱ्यानेही लावला त्याचा परिणाम असा झाला की हाच झेंडू रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली. 
आज राशिवडे येथील निशिगंध, घुणकी, जयसिंगपूर परिसरातील गुलाब, झेंडूंची आवक झाली. समितीतर्फे उत्पादक शेतकरी व खरेदीदारांचा सत्कार झाला. फूल बाजारासाठी सर्वोतपरी सहकार्याचे आश्‍वासन सदस्य विलास साठे यांनी दिले. उपसभापती आशालता पाटील, शेखर येडगे, उत्तम धुमाळ, नंदकुमार वळंजू, बाबूराव खोत, भगवान काटे, सचिव दिलीप राऊत,मोहन सालपे, राजेंद्र मंडलिक, कृषी उत्पन्न पणन मंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत फुलांचा बाजार असेल.