जंगल... भटकंती आणि कारवाई

जंगल... भटकंती आणि कारवाई

कोल्हापूर - जंगलात भटकंती हा अनेकांचा छंद आहे. निसर्गाची विविध रूपे अनुभवण्याची त्यांच्या दृष्टीने ही जरूर संधी आहे; पण जंगलात प्रवेश करण्यापूर्वी काही खबरदारी घेतली नाही तर कारवाईला सामोरे जावे लागते हे सह्याद्री टायगर रिझर्व्हमध्ये काल झालेल्या कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे. जंगलात कोअर व बफर असे दोन भाग असतात. यांपैकी कोअर भागात कोणालाही प्रवेश करता येत नाही आणि प्रवेश केला तर वन विभागाच्या कायद्यानुसार कारवाई होते. बेकायदेशीर प्रवेश सिद्ध झाला तर तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. 

जंगलात भटकंती हा निश्‍चित चांगला अनुभव असतो; पण प्रत्येक जंगलात पर्यटकांसाठी म्हणून २० ते ३० टक्के भागच खुला असतो. तेथे परवानगी घेऊन पर्यटकांना जाता येते. सह्याद्री टायगर रिझर्व्हचा विचार केला, तर त्याच्या क्षेत्रात बामणोली, वासोटा किल्ला वगैरे भाग येतो; पण तेथे पर्यटकांना पूर्वपरवानगीने जाता येते; मात्र जंगलातून दिवस मावळण्यापूर्वी पर्यटकांना बाहेर पडावेच लागते.

कोणालाही मुक्काम करता येत नाही. राधानगरी, दाजीपूर अभयारण्यातही हीच परिस्थिती आहे. तेथील काही भागांतच पर्यटकांना प्रवेश आहे. जंगलात आत मुक्कामास मनाई आहे. जेथून प्रवेश बंद किंवा मनाई असते, त्याचे प्रसिद्धीकरण केलेले असते. हे उत्साही पर्यटकांना माहीत नसते व त्यांना कारवाईला सामोरे जावे लागते. अर्थात सराइतांना हे माहीत असूनही त्यांचा वावर अशा कोअर जंगलात असतो. त्यांच्याकडूनच जंगल क्षेत्रात शिकारीचा किंवा वनस्पती चोरीचा धोका असतो. 

जंगलात प्रवेश करणारे सर्व जणच शिकारीच्या उद्देशाने जात नाहीत. अनेकांना जंगल भटकंतीची आवड आहे. अलीकडच्या काळात त्याची आवड वाढली आहे. अशा परिस्थितीत कोअर व बफर झोन असा फरक खऱ्या जंगलप्रेमींना कळत नाही. त्यामुळे कोठे प्रवेश खुला आहे व कोठे नाही हे वन विभागाने नेमकेपणाने स्पष्ट केल्यास अनेक कटू प्रसंग टळतील. जंगलातल्या अनेक वाटा चकवा देणाऱ्या असतात. त्यामुळे अनेक ट्रेकर्स वाटा चुकतात व घनदाट जंगलात अडकतात. त्यामुळे वन विभागाने वस्तुस्थिती पाहूनच कारवाई करावी. 
- प्रमोद पाटील,
जंगल भटकंती प्रेमी

घनदाट जंगलात कोणालाही प्रवेश करता येत नाही. कोअर झोन म्हणून त्या जंगलाला ओळखले जाते. घनदाट जंगलात वन्य प्राण्यांचा वावर असतो. त्यांच्या अस्तित्वाला धोका पोहोचू नये म्हणून ही खबरदारी घ्यावीच लागते आणि कोअर जंगलात प्रवेश करणाऱ्याला कारवाईला सामोरे जावेच लागते. 
- सुरेश साळुंखे,
वन अधिकारी, सह्याद्री टायगर रिझर्व्ह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com