#forestconservation साक्षरतेतून दुर्मिळ वृक्ष संवर्धन

#forestconservation साक्षरतेतून दुर्मिळ वृक्ष संवर्धन

कोल्हापूर - वन विभागाच्या वतीने शतकोटी वृक्ष लागवड मोहीम होत आहे; मात्र जुन्या झाडांची या नोंदी घेणे, दुर्मिळ झाडांच्या संवर्धनासाठी आवश्‍यक असलेला वन साक्षरतेचा अभाव हे सर्वच पातळ्यांवर ठळक आहे. अशा स्थितीत प्रत्येक तालुक्‍यात मोजक्‍याच संख्येने शिल्लक असलेल्या दुर्मिळ वृक्षांच्या प्रजाती संवर्धित करण्यासाठी निसर्ग मित्र संस्था व हौशी निसर्गप्रेमी पुढाकार घेत आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून निसर्ग वन साक्षरतेचा उपक्रम राबवत आहे.   

जिल्ह्यातील बीडीओंची नुकतीच एका कार्यशाळा झाली. त्यात प्रत्येक तालुक्‍यातील दुर्मिळ झाडे संवर्धनाचा विषय चर्चेत आला. वनविभाग किंवा सामाजिक वनीकरण विभागाने त्यांच्या अखत्यारीतील झाडांची नोंद ठेवली. त्या पलीकडे जाऊन खासगी क्षेत्र अन्य शासकीय क्षेत्रातील झाडांच्या नोंदी झालेल्या नाहीत. इथूनच वनसाक्षरतेच्या अभावाची सुरुवात होते. हीच बाब विचारात घेऊन यंदा निसर्ग मित्र संस्था व हौशी निसर्गप्रेमीतर्फे वनसाक्षरतेचा उपक्रम राबवत आहे.  

निसर्ग मित्रचे कार्यवाह अनिल चौगुले म्हणाले की, ‘‘विविध गावे, परिसर व प्रभागातील झाडांची मोजणी करणे, झाडे कोणत्या प्रकारची किती याची गणना करणे, त्यानंतर लोकसंख्येच्या तुलनेत तेवढे वृक्ष आच्छादन आहे काय? तेवढी झाडे लावली आहेत काय याचा मेळ घेणे, कोणती झाडे कोणत्या भौगोलिक वातावरणात किती व कशी वाढू शकतात, कोणत्या पक्ष्यांना त्याची फळे उपयोगी पडतात, जैवविविधतेची परिसंस्था अबाधित राखण्यासाठी झाडे कशी उपयोगी ठरतील, याची माहिती नोंदविण्याची पद्धत सांगण्यात येईल.’’  

यात परिसरातील दुर्मिळ झाडांच्या फळे बियांचे संकलन केले जाईल. या बियांची रोपवाटिकांतून नवीन रोपे तयार करून त्यांची लागवड  करण्यात येईल, यातून दुर्मिळ होणाऱ्या झाडांच्या प्रजातींची संख्या वाढविण्याबरोबर वनसाक्षरतेतून निसर्ग साखळी अबाधित राखण्यास मदत होणार आहे, असेही श्री. चौगुले यांनी सांगितले. 

चौफेर वृक्षसंपदा महत्त्वाची - पराग केमकर
निसर्ग संपदेसाठी गवताळ, कुरणे सदाहरित वने, कायम झुडूपवर्गीय वने असे त्याचे चौफरे स्वरूप महत्त्वाचे आहे. सर्व प्रकारच्या वनातील दुर्मिळ होणाऱ्या झाडांचे संवर्धन करण्यामुळे निसर्ग साखळी अबाधित राखण्यास मदत होईल. त्यातून मिळणारा डिंक, वनौषधी, साली, पाने याचा उपयोग लघुउद्योगासाठी होऊ शकले. म्हणून गवताळ कुरणे, वेलवर्गीय व मोठ वृक्ष याची गणना, वृक्षारोपण करताना कुठे काय लावावे, किती अंतरावर लावली याचा अभ्यास होणे आवश्‍यक आहे.

विविध तालुक्‍यातील दुर्मिळ झाडे अशी... 

  •  करवीर      कदंब, बेल 
  •  गगनबावडा      काटे सावर, गुलाबी पिवळ्या फुलांचे झाड, सिता अशोक
  •   पन्हाळा      मोह, अनकोल, कांदोळ 
  •  राधानगरी      सुरंगी, कुंभा, भेहडा, लाल जांभूळ
  •  भुदरगड      नागकेशर, पामवर्गीय विविध प्रकार 
  •  आजरा      वड वृक्ष, सातवीन 
  •  चंदगड      बंपर, पळस 
  •  शिरोळ      कवठ, बेल 
  •  हातकणंगले      कुडुलिंब, शमी, आपटा 
  •  कागल      बारतोडी, हुंब,
  •  शाहूवाडी      करंबळ, कासा, पिंपर्णी, पळस, रिटा  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com