दरोडा, जबरी चोरी करणाऱ्या पोलिस रेकॉर्डवरील चार सराईत चोरट्यांना अटक

 दरोडा, जबरी चोरी करणाऱ्या पोलिस रेकॉर्डवरील चार सराईत चोरट्यांना अटक

कोल्हापूर - दरोडा, जबरी चोरी करणाऱ्या पोलिस रेकॉर्डवरील चार सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी १९ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून मोबाईल हॅण्डसेटसह मोटारसायकली असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सूरज सर्जेराव दबडे (वय २०, रा. वाठार पैकी साखरवाडी, ता. हातकणंगले), ओंकार महेश सूर्यवंशी (१९, बॅंक ऑफ इंडिया शाखेसमोर), गोविंद वसंत माळी (१९, यशवंतनगर कॉलनी, दोघे कासेगाव, ता. वाळवा) आणि विराज गणेश कारंडे (१९, रा. पाडळी दरवेश, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत अन्य दोन अल्पवयीन असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी दिली.

पोलिसांनी सांगितले, की ३ मार्च २०१८ ला रात्री कोल्हापूर-पन्हाळा रोडवरून मोटारसायकलीवरून जाताना बोरपाडळे फाट्याजवळ विजय हिंदूराव पेटकर (रा. सावर्डे पैकी आमतेवाडी, ता. पन्हाळा) आणि गजानन सुभाष मोहिते (रा. नावली, पन्हाळा) यांना सहा अज्ञात तरुणांनी तलवारीचा धाक दाखवून मारहाण केली. त्यांच्याकडील रोकड, लॅपटॉप, मोबाईल हॅण्डसेट, मोटारसायकल असा मुद्देमाल लुटला. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दिनकर मोहिते आणि कोडोलीचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी तपास सुरू केला.

संशयित अमृतनगर फाटा येथील एका हॉटेलमध्ये आज दुपारी जेवणासाठी येणार असल्याची माहिती कोडोली आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यांनी तेथे छापा टाकून चौघांसह अन्य दोन विधी संघर्ष बालकांना (अल्पवयीन) ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडे माहिती घेतली असताना त्यांनी ठिकठिकाणी चोऱ्या केल्याची माहिती पुढे आली. त्यांना अटक करून मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोडोली, पन्हाळा, शाहूपुरी, वडगाव, हातकणंगले पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या चौघांनी गुन्हे केले आहेत. सांगलीसह जिल्ह्यात शिराळा, कुरळप, कडेगाव, इस्लामपूर हद्दीत गुन्हे केले आहेत. त्यांनी चार दरोडे, चार जबरी चोऱ्या, दोन घरात चोरी, सात दुखापतींचे गुन्हे, एक बॅटरी चोरी अशा १९ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

जप्त मुद्देमाल-  
महागडे ११ मोबाईल, २४ हजार ८०० रुपये रोख, सात मोटारसायकली, २८ ग्रॅम सोन्याचे दागिने, १०२ ग्रॅमचे चांदीचे दागिने, दोन बॅटऱ्या, सात-बारा पुस्तके, इन्व्हर्टर असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल आणि तलवार, सत्तूर, हॅण्ड लायटर, असा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सूरज दबडेवर १५ गुन्हे
सूरज दबडे, ओंकार सूर्यवंशी आणि गोविंद माळी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यापूर्वी त्यांच्यावर कळे, पन्हाळा, वडगाव, करवीर, शाहूवाडी, कराड व कासेगाव पोलिस ठाण्यांत चोरी, घरफोडी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दबडेवर तर मोटारसायकल चोरी व घरफोडीचे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. ओंकार व गोविंदवर मोटारसायकल चोरी आणि घरफोडीचे प्रत्येकी चार गुन्हे दाखल आहेत.

श्रेयवादासाठी धडपड
१२ मार्चला दुपारच्या जेवणासाठी आलेल्या चोरट्यांना पोलिसांनी हॉटेलजवळ छापा टाकून पकडले. त्यांच्याकडून साधारण साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, असेही पोलिसांच्या निवेदनामध्ये म्हटले आहे. गंमत म्हणजे दुपारी एक-दीडच्या सुमारास सर्वजण पोलिस मुख्यालयात होते, तेही मुद्देमालासहित. केवळ तासाभरात हे शक्‍य आहे का? तरीही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कोडोली पोलिस ठाण्याकडून श्रेयवादासाठी सर्व घडवून आणल्याची चर्चा खुद्द पोलिस मुख्यालयात सुरू होती. काहींनी माध्यम प्रतिनिधींनाही गोळा केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com