वृद्ध दाम्पत्याला डांबून ४ लाखांची जबरी चोरी

कोल्हापूर ः पाचगाव जगतापनगर येथे चोरट्याने घरात घुसून पती-पत्नीस डांबून घालून घरातील किमती ऐवज पळवून नेला. त्याचा पंचनामा करताना करवीर पोलिस.
कोल्हापूर ः पाचगाव जगतापनगर येथे चोरट्याने घरात घुसून पती-पत्नीस डांबून घालून घरातील किमती ऐवज पळवून नेला. त्याचा पंचनामा करताना करवीर पोलिस.

कोल्हापूर - घरात एकटेच बसलेल्या ज्येष्ठ दाम्पत्याला एका खोलीत डांबून चोरट्यांनी घरातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह चार लाखांची जबरी चोरी केली. ४ डिसेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार पाचगाव रोडवरील जगतापनगर येथे घडला. या प्रकरणी लीला शिवलिंग खतकल्ले (वय ६०, रा. जगतापनगर, ओंकार ग्रुपजवळ, पाचगाव रोड) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली.

चोरीनंतर श्री. खतकल्ले यांच्या लॅंडलाईनवर फोन करून अज्ञाताने या चोरीबाबत तक्रार केल्यास ठार करण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

वृद्ध दाम्पत्य घरात एकटे असल्याचे पाहून त्याच घरात त्यांना डांबून चोरी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यातही चोरीनंतर चोरट्यांनी फोनवरून धमकी देण्याचाही हा पहिलाच प्रकार आहे. घटनेनंतर श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले; पण त्यातून माग निघाला नाही. ठसेतज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.  

सौ. खतकल्ले व त्यांचे पती दोघेच घरात राहतात. ४ डिसेंबरला रात्री जेवण करून हे दांपत्य बसले असताना अज्ञातांनी त्यांच्या घराची बेल वाजवली. कोण आले, हे पाहण्यासाठी श्री. खतकल्ले यांनी दरवाजा उघडला असता जबरदस्तीने दोन अनोळखी तरुण घरात घुसले. त्यांनी या दाम्पत्याला घरातील एका खोलीत डांबून टाकले. त्यानंतर घरातील ८० हजार रोख रकमेसह तीन लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीला गेलेल्या दागिन्यात एख लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या, ३० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम सोन्याची चेन, २० ग्रॅम वजनाचे ४० हजार किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट, एक लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गोठ, २० हजार रुपयांचे देवाचे मंगळसूत्र व तेवढ्याच किमतीच्या एका नेकलेसचा समावेश आहे. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सुरू आहे. 

कॉल डिटेल्सची चौकशी सुरू
घरातील चार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्यानंतर अज्ञाताने श्री. खतकल्ले यांना मोबाईलवर फोन करून ठार करण्याची धमकी दिली आहे. एका लॅंडलाईनवरून हा फोन आला होता. या काळात श्री. खतकल्ले यांच्या मोबाईलवर आलेल्या सर्वच फोनचे कॉल डिटेल्स तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी सायबर विभागाची मदत घेण्यात येत आहे.  

चोरटे ओळखीचे असण्याची शक्‍यता
श्री. खोतकल्ले यांना मोबाईलवर फोन करून धमकी दिल्याने हे चोरटे ओळखीचे असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. पाचगाव परिसरातीलच एका लॅंडलाईनवरून हे फोन आले आहेत, त्यांच्याकडे श्री. खोतकल्ले यांचा मोबाईल क्रमांक कसा काय मिळाला? याची शहानिशा सुरू आहे. 

पुन्हा खंडणीसाठी धमकी
ही चोरीची घटना ४ डिसेंबरला घडली; पण घाबरून या दाम्पत्याने आज फिर्याद दिली. दरम्यानच्या काळात संशयितांनी भिवंडी, पुणे येथून श्री. खतकल्ले यांच्या मोबाईलवर फोन करून पुन्हा खंडणीची मागणी केली. फिर्याद देताना ही माहिती श्री. खतकल्ले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com