रोपांवर खर्च दाखवून दोन लाखांचा गैरव्यवहार

रोपांवर खर्च दाखवून दोन लाखांचा गैरव्यवहार

कोल्हापूर - महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मौजे मोसम (ता. शाहूवाडी) येथे एक लाख २० हजार वृक्षांची रोपवाटिका तयार केली होती. याच रोपवाटिकेतील रोजगार हमी योजनेत तयार केलेली १५ हजार रोपे संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (जेएफएम) तयार केली असल्याचे दाखवून पेंडाखळे येथील वनअधिकाऱ्यांनी संगनमताने दोन लाख २० हजार ९०० रुपयांवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. यातील एका वनअधिकाऱ्याने राशिवडे, आमजाई व्हरवडे, शिवाजी पेठ, शुक्रवार पेठ येथील नातेवाईकांना कामगार दाखवून निधी हडपला असल्याचे समोर येत आहे.

राज्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड होण्यासाठी सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वसामान्य लोक स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करून वृक्ष लागवड करत आहेत. दुसरीकडे चार कोटी वृक्ष लागवडीसाठी शासन आणि वन विभागाने दिलेला दोन लाख २० हजार ९०० रुपयांचा निधी पेंडाखळे वनक्षेत्रपाल, पेंडाखळे वनपाल आणि नांदगाव वनरक्षकांनी खिशात घालून शासकीय निधीत गैरव्यवहार केल्याची माहिती स्पष्ट होत आहे.   

मोसम येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत रोजगार हमी योजनेतून तयार केलेली १२ हजार ५०० रोपे पेंडाखळे वनअधिकाऱ्यांनी स्वत:च तयार केल्याचे दाखवले आहे. हे करताना रोप तयार होण्याआधीच त्याला पाणी घातले म्हणून 
त्याची बिले आदा केली आहेत. यामध्ये पेंडाखळे वनपालांनी रोपवाटिका तयार करण्याचे काम ऑक्‍टोबर २०१६ पासून सुरू केल्याचे दाखवले आहे. त्याच कामाची मजुरी दहा महिन्यांनी आदा केल्याचे कागदपत्रांवरून लक्षात येते. तसेच अरुण पाटील (रा. राशिवडे) यांनी १ नोव्हेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१६ या कालावधीत मोसम येथील रोपवाटिकेत ७ हजार ५०० पिशव्यांमध्ये माती, शेणखत व वाळू यांचे मिश्रण भरल्याचे दाखवले आहे. पाटील यांना या कामाचे १७ हजार २५० रुपयांची मजुरीही दिली आहे. मात्र, याच कालावधीत म्हणजेच १२ नोव्हेंबर २०१६ ते १० डिसेंबर २०१६ दरम्यान अरुण पाटील यांनीच मौजे घुंगूर येथे १२५० खड्ड्यांची खोदाई केल्याचे दाखवले आहे.

खोदाईसाठी श्री. पाटील यांना २४ हजार ४५० रुपये दिले आहेत. त्यामुळे एकच कामगार मौजे मोसम येथे पिशव्या भरण्याचे काम करत असल्याचे आणि मौजे घुंगूरमध्ये खड्डे खोदाईचे काम करत असल्याचे दाखवले आहे.

याशिवाय, विनायक पाटील (रा. राशिवडे) या कामगाराने १ ऑक्‍टोबर २०१६ ते ३० ऑक्‍टोबर २०१६ दरम्यान मोसम या गावी रोपवाटिकेतील रोपांना दिवसातून दोनवेळा पाणी दिले म्हणून २४ हजार रुपये दिले आहेत. यावरून मोसम रोपवाटिकेत नोव्हेंबरमध्ये पॉलीथिन पिशव्या माती, शेणखताने भरल्या आणि त्याच पिशव्यातील रोपांना ऑक्‍टोबरमध्ये पाणी देण्यासाठी २४ हजार रुपये खर्च दाखवल्याने कागदपत्रांतील बनवेगिरी उघड झाली आहे. 

कोल्हापूर वनवृत्तामधील कोल्हापूर, सातारा, सांगली वन विभागात २०१७ ला पावसाळ्यामध्ये चार कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत वन विभागाकडून रोपवाटिका तयार केल्या होत्या. मौजे मोसम येथील रोपवाटिकांमध्ये ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १७ नोव्हेंबर २०१६ ते १८ ऑगस्ट २०१७ दरम्यान एक लाख २० हजार रोपे तयार केली आहेत. ही रोपे तयार करण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत १२ लाखांचा निधी खर्च केला आहे. 

दरम्यान, पेंडाखळे वन क्षेत्रामध्ये २०१७ च्या वृक्ष लागवड योजनेंतर्गत मौजे घुंगूर येथे २० हेक्‍टर क्षेत्रावर प्रति हेक्‍टरी ६२५ रोपे याप्रमाणे १२ हजार ५०० रोपे लागवड करावीत, यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (जेएफएम) रोपवाटिकेसाठी दोन लाख २० हजार ९०० रुपयांचा निधी मिळाला होता. वास्तविक संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमातून स्वतंत्र रोपे तयार केली पाहिजे होती. मात्र, वनक्षेत्रपाल, वनपाल आणि वनरक्षकांनी चालाखी दाखवत मौजे मोसम येथेच रोजगार हमीतून तयार केलेल्या एक लाख २० हजार रोपांमधीलच १५ हजार रोपे स्वतंत्र तयार केल्याचे कागदोपत्री दाखवले आहे.

 असा झाला घोटाळा... 
मोसम येथे रोजगार हमीतून एक लाख २० हजार रोपे तयार केली. यासाठी १२ लाखांचा निधी खर्च केला होता. त्यानंतर याच एक लाख २० हजार रोपांमधील १२ हजार ५०० रोपे पेंडाखळे वनक्षेत्रपाल, वनपाल आणि नांदगाव वनरक्षकांनी मौजे घुंगूर येथे वृक्षारोपणासाठी नेली. ज्या १५ हजार रोपांवर रोजगार हमी योजनेतून खर्च केला आहे, त्याच रोपांवर संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत खर्च केल्याचे दाखवून वनअधिकाऱ्यांनी वन विभागाचा दोन लाख २० हजार ९०० रुपये निधी लाटला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com