अधिकार मंडळांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

प्र-कुलगुरू पदी कोण याची चर्चा - १५ ऑगस्टला तारखा जाहीर होण्याची शक्‍यता
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून येत्या १५ ऑगस्टला निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची चिन्हे आहेत. या आठवडाभरात राज्यपाल नामनिर्देशित ११ व कुलगुरू नामनिर्देशित ३ सदस्यांच्या नावांची घोषणा होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. यासह विद्यापीठाच्या कायमस्वरूपी प्र-कुलगुरूपदी कोण विराजमान होणार, याची चर्चा 
सुरू आहे. 

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार यंदा विविध अधिकार मंडळांच्या निवडणुका होत आहेत. निवडणूक प्रक्रिया ३० नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करायची असल्याने विद्यापीठात विविध संघटना कोणत्या अधिकार मंडळाच्या निवडणुकीत मुसंडी मारता येईल, याची चाचपणी करत आहेत. अधिसभेसाठी (सिनेट) राज्यपाल व कुलगुरू नामनिर्देशित सदस्यांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत. ही नावे २०१६ अखेर जाहीर होतील, असे सांगितले जात होते. ही नावे येत्या आठवडाभरात जाहीर होतील, असा अंदाज आहे. 

अमरावती व गोंडवना विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदाच्या नावांची घोषणा झाली आहे. मुंबई विद्यापीठातील परीक्षेचा सावळा गोंधळा पाहता तेथे कायमस्वरूपी प्र-कुलगुरू पदासाठी हालचाली अद्याप वेगवान झालेल्या नाहीत. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. एन. मालदार हे येत्या नोव्हेंबर २०१७ ला सेवानिवृत्त होत आहेत. उर्वरित तीन महिन्यांसाठी प्रभारी प्र-कुलगुरूपदी एखाद्या व्यक्तीची निवड केल्यास त्यांचा कार्यकाळ कुलगुरूंच्या सेवानिवृत्तीसोबतच समाप्त होईल. त्यामुळे सोलापूर विद्यापीठात नव्या कुलगुरू नियुक्तीनंतरच प्र-कुलगुरू निवडण्यात येईल. शिवाजी विद्यापीठ, जळगावचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कायमस्वरूपी प्र-कुलगुरू नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. शिवाजी विद्यापीठात सध्या प्रभारी-प्रकुलगुरू पदी डॉ. डी. टी. शिर्के असून तेच कायमस्वरूपी प्र-कुलगुरू पदी राहणार की अन्य एखादी व्यक्ती या पदावर निवडण्यात येणार, हे येत्या काही दिवसांत पाहायला मिळेल. 

विशेष म्हणजे शिवाजी विद्यापीठात निवडणुकांच्या तारखांची घोषणा १५ ऑगस्टपर्यंत होईल, असे सांगण्यात येत असले, तरी सोलापूर विद्यापीठाने निवडणुकांची जय्यत तयारी केली आहे. सोलापूर विद्यापीठाच्या उद्या (ता. ९) मतदारयाद्या प्रसिद्ध होत आहेत. शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे संस्थापक वसंतराव मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकांची तयारी केली जात आहे. 

दृष्टिक्षेपात
अमरावती व गोंडवना विद्यापीठात प्र-कुलगुरूंची नियुक्ती
सोलापूर विद्यापीठात निवडणुकांची जय्यत तयारी
शिवाजी, पुणे, जळगाव विद्यापीठ कायमस्वरूपी 
प्र-कुलगुरूंच्या प्रतीक्षेत