गजर पारंपरिक वाद्यांचाच!

गजर पारंपरिक वाद्यांचाच!

विसर्जन मिरवणूक - अंध मुलांचा ऑर्केस्ट्रा, लोकनृत्ये अन्‌ चित्ररथांचा थाट
कोल्हापूर - डॉल्बीला मिरवणुकीतून हद्दपार करून पारंपरिक वाद्यांच्या गजरातच उद्या (ता. ५) बुद्धिदेवता श्री गणरायाला निरोप दिला जाणार आहे. विविध लोकनृत्ये, चित्ररथांसह पारंपरिक वाद्यांच्या तालाला मल्टिकलर शार्पी आणि भव्य एलईडी स्क्रीनची सप्तरंगी झालर लाभणार आहे. त्याशिवाय यंदा अंध मुलांचे ऑर्केस्ट्राही मिरवणुकीत असतील. दरम्यान, हा सारा आनंदोत्सव अनुभवण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे.

‘दिलबहार’चे मेलडी बीटस्‌
दिलबहार तालीम मंडळाने यंदा डॉल्बीमुक्त मिरवणुकीचा निर्णय जाहीर केला आहे. साळोखे बंधू यांचा ‘सेव्हन मेलडी’ ऑर्केस्ट्रा मिरवणुकीत असेल. हजारो कार्यकर्त्यांचा जथ्था त्यावर ताल धरेल. विविध स्पर्धांत अनेक बक्षिसे मिळवलेला हा ऑर्केस्ट्रा असून सॅक्‍सोफोन खास वैशिष्ट्य असेल.

‘लेटेस्ट’चा भव्य चित्ररथ  
मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळ यंदाही शंभर ढोलवादक व २६० कोल्हापुरी गणवेशधारी कार्यकर्त्यांसह मिरवणुकीत सहभागी 
होईल. ‘जय जवान, जय किसान’ हा चित्ररथ मिरवणुकीत असेल. पांढरा शर्ट, पांढरी पॅंट, पायात कोल्हापुरी चप्पल अशी पारंपरिक वेशभूषा करून १०० तिरंगी झेंडे घेऊन कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी होतील. गोलिवडे येथील योगी प्रभुनाथ महाराज झांजपथक असेल. देशभक्तिपर गीते मिरवणुकीत सादर होणार आहेत.
 
‘खंडोबा’चे ढोल-ताशा पथक
शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळानेही डॉल्बीमुक्तीचा नारा दिला असून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक निघेल. महालक्ष्मी ढोल-ताशा हे १२० जणांचे ढोल पथक मिरवणुकीत असेल. भागातील सुमारे दोन हजार महिला एकाच रंगाच्या साड्यांत मिरवणुकीत सहभागी होतील. आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला, तसेच आनंदराव ठोंबरे यांचे मर्दानी पथक, पन्नास मुलींचे लेझीम पथक असेल. 

‘फिरंगाई’ टाळ्यांच्या गजरात
भगव्या, हिरव्या व गुलाबी साड्या अशा पेहरावात फिरंगाई तालीम मंडळाच्या मिरवणुकीत यंदा महिलांचा मोठा सहभाग राहणार आहे. 
विशेष म्हणजे मिरवणुकीत एकाही वाद्याचा समावेश नसेल. केवळ टाळ्यांच्या गजरात मिरवणूक निघेल. मिरवणुकीतील महिला तिरंगी साड्यांत, तर इतर सर्व कार्यकर्ते पांढऱ्या टोप्या परिधान करून सहभागी होतील. मात्र यंदा महिलांचा मोठा सहभाग, हेच मिरवणुकीचे वैशिष्ट्य असेल. 

बागल चौक मंडळाचे ढोलपथक
बागल चौक मंडळ यंदा डॉल्‍बीबंदच्‍या आवाहनाला प्रतिसाद देत पारंपरिक वाद्यांच्‍या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक काढणार आहेत. मिरवणूकीत शिवगर्जना ढोल पथकाचे ६० कलाकार सहभागी होणार असून यामध्‍ये महिलांची संख्‍या लक्षणीय असणार आहे.

‘शाहूपुरी युवक’चा ऑर्केस्ट्रा
शाहूपुरी व्यापारी पेठेतील शाहूपुरी युवक मंडळाने यंदा ‘सर्जिकल स्ट्राईक’ देखावा साकारला आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विसर्जन मिरवणुकीत मंडळातर्फे दिल्ली येथील अमर जवान ज्योत स्मारकाची भव्य प्रतिकृती असेल. त्याशिवाय अंध मुलांचा ऑर्केस्ट्रा मिरवणुकीत असेल. त्याशिवाय दोनशेहून अधिक कार्यकर्ते आर्मी ड्रेसमध्ये सहभागी होतील.

‘तटाकडील’चा हरियानवी डान्स 
तटाकडील तालीम मंडळातर्फे यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत जोया हरियानवी डान्स ग्रुपचे आकर्षण असेल. हा ग्रुप फाग नृत्य, धुमर नृत्य, पनिहारी नृत्य, धमाल नृत्य सादर करेल. हरियाना सरकारचा हा ग्रुप देशात प्रतिनिधित्व करतो. गेल्या वर्षी मंडळाने आसाममधील भिवू लोकनृत्य आणले होते.

‘स्वयंभू गणेश’च्या पिशव्या
लक्ष्मीपुरीतील स्वयंभू गणेश मित्र मंडळाची डॉल्बीमुक्त मिरवणूक असेल. पोलिस व कर्मचाऱ्यांना मंडळातर्फे पौष्टिक आहार व पाण्याचे वितरण केले जाईल. त्याशिवाय पर्यावरणपूरक एकवीसशे पिशव्यांचे वितरण होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com