मुश्रीफांचा डाव हाणून पाडण्यासाठी घाटगे गट एकसंध

मुश्रीफांचा डाव हाणून पाडण्यासाठी घाटगे गट एकसंध

म्हाकवे - सत्तेमुळे अंध झालेले हसन मुश्रीफ घाटगे गटाला कमी लेखून अवमानित करत आहेत. घाटगे गट एकत्र येऊ नये, तो परस्परांत भांडत राहावा, हा मुश्रीफांचा कुटिल डाव आहे. या भीतीपोटी ते दोन्हीही घाटगे गटांना विधानसभेसाठी आव्हान देत आहेत. घाटगे गटाला शुभेच्छा देण्याइतकी मुश्रीफांची नैतिक पातळी नाही. ज्यांना मुलाचा पराभव पचवता आला नाही, ते आमदारकीचा पराभव काय पचवतील? २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनता तुमचा पराभव करून स्वर्गीय मंडलिकांना श्रद्धांजली वाहतील. मुश्रीफांचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी जनताच घाटगे गटांना एकसंध करेल, असा विश्‍वास संजय घाटगे गटाचे प्रमुख धनराज घाटगे यांनी व्यक्त केला.  

व्हन्नाळी (ता. कागल) येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. नानीबाई चिखली येथील कार्यक्रमात मुश्रीफांनी दोन्ही घाटगे गटाला उपरोधात्मक शुभेच्छा दिल्या. मुश्रीफांचे विधान घाटगे गटातील कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले. त्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांनी मेळावा घेतला. ए. वाय. पाटील अध्यक्षस्थानी होते.

श्री. घाटगे म्हणाले, ‘‘स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आशीर्वादामुळेच तुम्ही आमदार, मंत्री होऊन लाल दिव्याच्या गाडीतून फिरलात. मात्र, ज्यांच्या जीवावर ही पदे भोगली, त्यांना अखेरच्या क्षणी तुम्ही त्रास दिला. जनता हे विसरलेली नाही. विधानसभेला संजय घाटगे यांचा पाच वेळा पराभव झाला. तो जनतेने नव्हे, तर तुमच्या कुटील नीतीमुळेच झाला. पराभव झाला असला तरी लढण्याची आमची अजूनही हिंमत आहे.’’ काकासो सावडकर यांनी प्रास्ताविक केले. आर. टी. मोरे, दत्तोपंत वालावलकर, सुरेश मर्दाने यांनी मनोगते व्यक्त केली. या वेळी अनिल गुरव, आनंदा तळेकर, अशोक पाटील, सुरेश पाटील, संजय कदम, महेश देशपांडे, संतोष ढवण, एम. टी. पोवार, के. बी. वाडकर, आदी उपस्थित होते. 

अन्नपूर्णा कारखान्याची काळजी करू नये
आमदार मुश्रीफांनी अन्नपूर्णा साखर कारखान्याची काळजी करू नये. या कारखान्याची उभारणी पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करतील. प्रसंगी जमिनी गहाण ठेवून कोणत्याही परिस्थितीत कारखान्याची उभारणी पूर्ण करतील. वर्षभरात कारखाना पूर्ण होऊन उच्चांकी ऊस दराची परंपरा जोपासू, असे प्रतिउत्तर ए. वाय. पाटील यांनी मुश्रीफांना देताच उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com