शेतीपूरक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवा - कुलगुरू डॉ. विश्‍वनाथा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - ‘‘कृषी उत्पादकता दिवसेंदिवस कमी झाल्याने शेतकरी संकटात आहे. अशात वाढत्या तापमानाचा परिणाम शेतीवर होत आहे, त्यामुळे शेती सावरण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शेती करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतीपूरक तंत्रज्ञान विकसित करून ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाची संकल्पना उपयुक्त ठरेल.’’ असे मत महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी येथे केले. 

कोल्हापूर - कृषी उत्पादकता दिवसेंदिवस कमी झाल्याने शेतकरी संकटात आहे. अशात वाढत्या तापमानाचा परिणाम शेतीवर होत आहे, त्यामुळे शेती सावरण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शेती करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतीपूरक तंत्रज्ञान विकसित करून ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाची संकल्पना उपयुक्त ठरेल, असे मत महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी येथे केले. 

येथील शासकीय कृषी महाविद्यालय, शासकीय कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. विश्‍वनाथा म्हणाले, ‘‘कृषी विद्यापीठाने शिक्षण संशोधन व विस्तार कार्यात भरीव कामगिरी केली. विद्यापीठाने संशोधित व शिफारस केलेले तंत्रज्ञान लहान शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल. त्या तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा, तसेच विद्यापीठातून तयार होणाऱ्या पदवीधर व शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या विकासास हातभार लावावा. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, विविध पीक पद्धती बदल, गट शेती प्रयोग याचा अवलंब करणे योग्य ठरेल.’’ 

विद्यापीठातून घडणाऱ्या कृषी पदवीधरांनी नोकरीच्या मागे न लागता, नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनावे, प्रत्येक गावातील एका कृषी पदवीधराने जबाबदारी घेऊन कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविल्यास शेती प्रगतशील होईल. सहयोगी अधिष्ठाता डॉ. गजानन खोत यांनी प्रस्ताविक केले. कृषी शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांनी कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी एकात्मिक शेतीपद्धत, जैविक कीड नियंत्रण, काढणी पश्‍चात तंत्रज्ञानाची गरज, याविषयी मनोगत व्यक्त केले. 

संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, सहसंचालक महावीर जंगटे यांनी कृषी योजनांची माहिती दिली. सुत्रकृमीद्वारे हुमणी किडीवर नियंत्रण या प्रयोगशाळेस शासनाने अनुदान दिले, त्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. सुभेदार यांनी दिली. प्रा. विजय तरडे यांनी आभार मानले.

शेतीपूरक तंत्रज्ञान सामग्रीचे प्रदर्शन
प्रदर्शनात पिकांवर सुरक्षित पद्धतीने रासायनिक खत, फवारणीचे प्रात्यक्षिक, उसाच्या भरीव जाती, नारळ सोलण्याचे यंत्र, भुईमूग सोलण्याचे यंत्र, दुग्धपूरक उत्पादने घेण्याचे यंत्र, विविध फळांचे रस, भुईमूग शेंगा, गूळ निर्मिती, सेंद्रिय शेती उत्पादने, ट्रेलर, मळणी यंत्र, नांगर, कोळपणी अशी कृषी अवजारे यांची मांडणी आहे, प्रत्येक स्टॉल्सवर कृषी तंत्रज्ञाकडून यंत्र हाताळणीची माहिती देत आहेत.

Web Title: Kolhapur News Give New Technology to farmers