‘गोकुळ’ची वार्षिक सभा रद्द करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) शुक्रवारी झालेली सभा बेकायदेशीर ठरवून ती रद्द करावी, अध्यक्षांसह संचालक व कार्यकारी संचालकांची याप्रकरणी चौकशी करावी, या मागणीचे निवेदन आज आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहनिबंधक (दुग्ध) अरुणकुमार चौगले यांना दिले. सभेचा अहवाल मागवून कारवाई करा, अन्यथा तुम्हालाही न्यायालयात खेचू, असा इशाराही श्री. पाटील यांनी दिला. 

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) शुक्रवारी झालेली सभा बेकायदेशीर ठरवून ती रद्द करावी, अध्यक्षांसह संचालक व कार्यकारी संचालकांची याप्रकरणी चौकशी करावी, या मागणीचे निवेदन आज आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहनिबंधक (दुग्ध) अरुणकुमार चौगले यांना दिले. सभेचा अहवाल मागवून कारवाई करा, अन्यथा तुम्हालाही न्यायालयात खेचू, असा इशाराही श्री. पाटील यांनी दिला. 

आमदार पाटील यांनी दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, विषयपत्रिकेवरील वाचन कार्यकारी संचालक यांनी करून त्याला मंजुरी देणे आवश्‍यक असताना संघाचे संचालकही नसलेल्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आपल्या भाषणात अहवाल दाखवून ‘विषय मंजूर’ असे सांगत सभा गुंडाळली आहे. या सभेत विषय पत्रिकेत कोणते विषय होते हेही वाचून दाखवले नाहीत. ही कृती बेकायदेशीर असल्याने सभाच रद्द करावी. श्री. महाडिक हे संघाचे संचालक, कर्मचारी किंवा अधिकारी नसताना त्यांनी सभेत ‘विषय मंजूर का?’ असे का विचारले. सभा संपल्याचे जाहीर करून कोणतीही पूर्वसूचना न देता राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. हा राष्ट्रगीताचाही अवमान आहे. त्यामुळे अध्यक्षांसह संचालक व कार्यकारी संचालकांची चौकशी व्‍हावी. 

सभेच्या पार्श्‍वभूमीवर संघाने लेखी प्रश्‍न ९ सप्टेंबरपर्यंत मागवले होते. त्याप्रमाणे विविध संस्थांनी ३४ प्रश्‍न संघाकडे पाठवले. या प्रश्‍नांची उत्तरे अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालकांनी द्यायला हवी होती. पण ही उत्तरे दिली तर सभासदांपुढे संघातील गैरकारभार बाहेर पडेल म्हणून बेकायदेशीररीत्या सभेचे कामकाज गुंडाळण्यात आले. या सभेला सहकार विभागाच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते का? आपल्या कार्यालयातील प्रतिनिधी उपस्थित होते का? या प्रतिनिधींनी सभेच्या कार्यवृत्ताची नोंद घेतली का? असेही प्रश्‍न विचारण्यात आले होते. संघाशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तींना सभेपूर्वी दोन तास अगोदर बोगस पास देऊन आत घेण्यात आले. याचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. 
शुक्रवारची सभा ही बेकायदेशीरच होती, ती रद्द करावी, त्याचा अहवाल संघाकडून मागवावा, त्यानुसार कारवाई करावी, अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊन त्यात तुम्हाला प्रतिवादी करू, असा इशारा पाटील यांनी दिला. 

निवेदन देण्यासाठी गेलेल्या या शिष्टमंडळात आमदार पाटील यांच्यासह माजी आमदार संपतराव पवार-पाटील, मारुती जाधव गुरुजी, जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील, माजी सभापती किरणसिंह पाटील, माजी संचालक बाबासाहेब चौगुले, बाळासाहेब कुपेकर, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब देवकर, करवीर सभापती प्रदीप झांबरे, सदाशिव चरापले, विश्‍वास नेजदार, अंजना रेडेकर, श्रीराम सोसायटीचे सभापती मदन जामदार आदी सहभागी झाले होते.

प्रमुख मागण्या
 सभेचा अहवाल मागवा
 अध्यक्ष, संचालकांवर कारवाई करा
 राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

Web Title: kolhapur news gokul annual meeting cancel