‘गोकुळ’ची सभा पुन्हा घ्यावी लागणार

सुनील पाटील
रविवार, 17 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - अधिकार नसणाऱ्या व्यक्तीने ठराव वाचून मंजुरी घेणे चुकीचे आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी वाचलेले आणि मंजूर करून घेतलेले ठराव संस्था उपविधीप्रमाणे योग्य नाहीत. यातील कोणत्याही ठरावाच्या मंजुरीला कायदेशीर आधार नाही.

कोल्हापूर - अधिकार नसणाऱ्या व्यक्तीने ठराव वाचून मंजुरी घेणे चुकीचे आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी वाचलेले आणि मंजूर करून घेतलेले ठराव संस्था उपविधीप्रमाणे योग्य नाहीत. यातील कोणत्याही ठरावाच्या मंजुरीला कायदेशीर आधार नाही.

प्रोसिडिंगमध्येही सभेच्या ठराव मंजुरीबाबत लेखापरीक्षणातही आक्षेप घेतला जाऊ शकतो. त्यामुळे ही सभा नव्याने घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे. तसेच यावर आता दुग्ध विभागाला आक्षेप घ्यावा लागणार आहे. 

‘गोकुळ’ म्हणजे जिल्ह्यातील धवलक्रांतीचा केंद्रबिंदू मानला जातो. श्री. महाडिक यांना स्वत:च्याच भाषणाचा विसर पडला आणि त्यांनी काल (ता. १५) ‘गोकुळ’च्या सभेत अधिकार नसतानाही अहवाल वाचन करून ठराव मंजूर करून घेतले. वास्तविक हा अधिकार सचिवांना असतो. सचिवांनी ठराव वाचन करायचे, सभासदांनी यावर सांगोपांग चर्चा करायची आणि त्यानंतर मंजुरी घ्यायची असते. 

श्री. महाडिक सांगत असलेले सभासदही गावपातळीवर असणाऱ्या आपआपल्या दूध संस्थांमध्ये असेच ठराव मंजूर करून घेतात. मात्र, ‘गोकुळ’च्या या मालक-मालकिणींच्या हक्कालाच हरताळ फासण्याचे काम ‘गोकुळ’मध्ये झाले. संचालकांनीही यावर एक शब्दही काढला नाही. प्रत्येकाचे हित एकमेकांत ‘अडकून’ असल्यामुळे सभासदांच्या हक्कावर सुरी ठेवली जात असताना याकडे पाहण्याशिवाय त्यांना कोणताही पर्याय नव्हता. एकीकडे इतर नेते ‘गोकुळ’च्या ५५ वर्षांचा गौरव सांगतात, तर दुसरीकडे सभासदांना प्रश्‍नही विचारू देत नव्हते. ‘गोकुळ’चा कारभार पारदर्शी म्हणायचे आणि सभासदांना वाऱ्यावर सोडून राष्ट्रगीताचा सोयीस्कर वापर करून सभा गुंडाळायची. मात्र, कालच्या सभेत सचिव किंवा कार्यकारी संचालकांऐवजी थेट श्री. महाडिक यांनीच अहवालावरील ठराव वाचन करून मंजुरी घेणे चुकीचे ठरणार आहे. या ठरावाला कोणताही कायदेशीर आधार नसेल. कालच्या सभेत सभासदांच्या हिताचा विचार झाला, असे म्हणणे धाडसाचे होणार आहे. त्यामुळेच अनेक सभासदांनी एकतर्फी आणि हुकूमशाही पद्धतीने झालेल्या सभेचा निषेध नोंदविला. कालच्या सभेत अध्यक्ष, नेत्यांची भाषणे झाली. मात्र, सभेसाठी आवश्‍यक असणाऱ्या कायदेशीर बाबींची पूर्तता केली नाही. त्यामुळे ही सर्वसाधारण सभा चुकीची व यातील मंजूर ठराव अवैध ठरणार आहेत. 

उपविधीतच तरतूद
संस्था किवा संघाच्या उपविधीतच वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याबाबत मार्गदर्शन सूचना केलेल्या आहेत. या उपविधीमध्ये संस्थेच्या किंवा संघाच्या सचिवाने सभासदांसमोर सभेपुढील विषय ठेवून मंजुरी घ्यावे लागते. या उपविधीला हरताळ फासून मंजूर केलेले ठराव कितपत योग्य ठरणार, यावर सवाल केले जात आहेत.

लाखोंचा खर्च पाण्यात 
जिल्ह्यात ‘गोकुळ’ला दूधपुरवठा करणाऱ्या ५६०० संस्था आहेत. यापैकी ३४५१ संस्था ‘अ’ वर्ग सभासद आहेत. या संस्थांच्या माध्यमातून तब्बल ५ लाख ५० हजार दूध उत्पादक ’गोकुळ’ला दूध घालतात. त्यामुळे कालच्या सभेसाठी १०० किलोमीटरवरून चारचाकी, दुचाकी वाहन घेऊन आलेल्या; पण अवेळी सभा संपल्यामुळे सभेला उपस्थित राहता आले नसणाऱ्या सभासदांचा येण्या-जाण्याचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला. 

Web Title: kolhapur news gokul general body meeting