"गोकुळ' सभेचा वाद सहकार न्यायालयातच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेचे वाचन व त्याला मंजुरी द्यावी अशी मागणी माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी केली असताना सभेच्या इतिवृत्तात मात्र सभेतील हे काम अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी केल्याची नोंद समोर आली आहे. यावरून विरोधकांनी या सभेविरोधात सहकार न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. 

"गोकुळ'ची वार्षिक सभा 15 सप्टेंबरला झाली. संघाच्या इतिहासात सभेला श्री. महाडीक यांच्यासह दुसरे नेते माजी आमदार पी. एन. पाटील पहिल्यांदाच उपस्थित होते. विश्‍वास पाटील यांचे अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर श्री. महाडीक बोलले. त्यांनी संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर हातात असलेल्या अहवालातील एकही विषय न वाचता यातील 1 ते 11 विषय मंजूर का ? अशी विचारणा करताच उपस्थितीतांनीही "मंजूर मंजूर'चा नारा दिला. त्यानंतर राष्ट्रगीत घेऊन सभा गुंडाळली. त्याचे तीव्र पडसाद नंतर उमटले. वास्तविक श्री. महाडीक संघाचे कर्मचारी किंवा संचालकही नसताना त्यांनी केलेल्या या कृत्तीवर आक्षेप घेण्यात आला. 

केर्ली (ता. करवीर) येथील संस्थेच्यावतीने आठ विविध मुद्यावर या सभेसंदर्भात उपनिबंधक दुग्ध यांच्याकडे तक्रार केली. यातील सभा कोणी घेतली, कामकाज कोणी चालवले हे मुद्दे उपनिबंधकांच्या कक्षेबाहेर आहेत, त्यासाठी विरोधकांना सहकार न्यायालयातच जावे लागणार आहे. नोटीस पाठवली का, सभासदांची नोंद घेतली का हे इतर मुद्दे या कक्षेत येत असले तरी विषयपत्रिकेचे वाचन, सभेचे संचलन या चौकशीचे अधिकार उपनिबंधकांना नाहीत. 

आमदार सतेज पाटील, माजी आमदार संपतराव पाटील आदींनी याबाबत निबंधक दुग्ध सुनिल सिरापूरकर यांच्याकडेही तक्रार केली होती. या तक्रारींच्या अनुषंगाने श्री. सिरापूरकर यांनी उपनिबंधक दुग्ध अरूण चौगले यांना चौकशीचे आदेश दिले होते. श्री. चौगले यांनी सभेच्या कामकाजाची चौकशी करून त्याचा अहवाल पाठवला. त्यात सभेचे कामकाज श्री. महाडीक यांनी चालवले असताना इतिवृत्तात मात्र हे काम विश्‍वास पाटील यांनी केल्याची नोंद केली आहे. हा मुद्दाच वादाचा ठरणार असून यावरून विरोधक पुन्हा आक्रमक झाले आहेत. सोमवारी याविरोधात सहकार न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या हालचाली आमदार सतेज पाटील यांच्याकडून सुरू आहेत.