‘गोकुळ’चे नेते-संचालक उपनिबंधकांच्या नोटीशीमुळे धास्तावले

‘गोकुळ’चे नेते-संचालक उपनिबंधकांच्या नोटीशीमुळे धास्तावले

कोल्हापूर - गायीच्या दूध दरात परस्पर केलेली कपात कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) अंगलट येण्याची शक्‍यता आहे. शासनाच्या आदेशानंतरही या दरात वाढ न केल्याबद्दल संघाला संचालक मंडळ बरखास्तीची नोटीस विभागीय उपनिबंधक सुनील सिरापूरकर यांनी पाठवल्याने संचालक व नेतेही धास्तावले आहेत. पंधरा दिवसांत किंवा २ मेपर्यंत या नोटिसीला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मुदतीत उत्तर न दिल्यास संचालकांसह कार्यकारी संचालकांनाही सहा वर्षे अपात्र ठरवण्याचा इशारा श्री. सिरापूरकर यांनी नोटिसीद्वारे दिला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यासाठी जून महिन्यात संप केला होता. यावर राज्य सरकारने गाय व म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करण्याचे निर्देश सहकारी संघांना दिले होते. त्यानुसार दूध उत्पादकांना गायची ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ दुधासाठी प्रतिलिटर २७ रुपये तर म्हशीच्या सहा फॅट व नऊ एसएनएफसाठी ३६ रुपये मिळणार होते. त्यानंतर प्रत्येक पॉइंटसाठी ३० पैसे वाढ मिळणार होती. सरकारने जाहीर केलेल्या या दरवाढीची अंमलबजाणी सर्वच संघांनी महिन्यांनी केली. 

सर्वच संचालकांना नोटिसा
नोटीस बजावलेल्या संचालकांत अध्यक्ष विश्‍वास पाटील, संचालक अरुण डोंगळे, उदय पाटील, अरुण नरके, दीपक पाटील, धैर्यशील देसाई, रणजितसिंह पाटील, रवींद्र आपटे, अमरिशसिंह घाटगे, राजेश पाटील, बाळासाहेब खाडे, जयश्री पाटील-चुयेकर, अनुराधा पाटील, विलास कांबळे, पांडुरंग धुंदरे व विश्‍वास जाधव यांचा समावेश आहे. 

आतंरराष्ट्रीय बाजारात पावडरच्या दरात घसरण झाल्याचे कारण पुढे करून दूध संघांनी सरकारच्या परवानगीशिवाय गायीच्या दूध खरेदीदर प्रतिलिटर दोन रुपये कमी केला. राज्य सरकारचा आदेश न पाळल्याने सर्व दूध संघांना प्रशासकीय कारवाईच्या नोटिसा बजवल्या होत्या. या नोटिसाविरोधात संघ एकवटल्याने त्या मागे घेण्यात आल्या व दराच्या अभ्यासासाठी एक समिती स्थापन केली. समितीची एकही बैठक झालेली नाही, तोपर्यंत श्री. सिरापूरकर यांनी कारवाईची नोटिसा बजावल्याने एकच खळबळ उडाली आहे.

उत्पादकांना १८ कोटींचा फटका 
शासन आदेशानुसार गाय व म्हैस दुधाचा दर प्रतिलिटर दर अनुक्रमे २७ व ३६ रुपये करण्यात आला. ‘गोकुळ’ ने १ नोव्हेंबर रोजी गायीच्या दूध दरात दोन रुपयाची कपात केली. त्यामुळे दूध उत्पादकांचे प्रतिलिटर दोन रुपयांनी नुकसान होत आहे. गोकुळ दररोज साडेपाच लाख लिटर दुधाचे संकलन करत आहे. दर कमी केल्यामुळे प्रत्येक महिन्याला तीन कोटी याप्रमाणे सहा महिन्यांत तब्बल १८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

नेते सरकारसोबत तरीही
‘गोकुळ’चे नेतृत्व माजी आमदार महादेवराव महाडिक करतात, त्यांची अलीकडची उठबस भाजप नेत्यांसोबत आहे. त्यांचे एक पुत्र भाजपचे आमदार आहेत. याउलट विधानपरिषदेत ‘गोकुळ’वरील कारवाईचा मुद्दा आमदार सतेज पाटील यांनी लावून धरला होता. त्या वेळी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी चौकशी करून कारवाईचे आश्‍वासन दिले होते. तत्पूर्वीच थेट संचालक मंडळ बरखास्तीची नोटीस आली. सरकारसोबत असूनही ही नोटीस आल्याने नेतेही धास्तावले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com