"गोकुळ' अपहारप्रकरणी गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

अमित पवार मुख्य संशयित- शॉपीतून विकलेल्या मालाचे 63 लाख घातले खिशात 

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) शॉपीत झालेल्या 63 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी आज शॉपी इनचार्ज अमित अशोकराव पवार (रा. नवीन वाशी नाका, मूळ गाव-राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी) यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी संघाचे वरिष्ठ लेखाधिकारी सदाशिवराव श्रीपती पाटील (रा. हिरवडे खालसा) यांनी फिर्याद दिली आहे. 

जुन्या पुणे-बंगळूर महामार्गावर हॉटेल ओपलशेजारी "गोकुळ' ची शॉपी आहे. या शॉपीतून दुग्धजन्य पदार्थांची होलसेल विक्री केली जाते. अमित हा या शॉपीचा इनचार्ज कम क्‍लार्क आहे. या शॉपीतून विकल्या गेलेल्या मालाचे सुमारे 63 लाख रुपये संघाकडे न भरता अमितने त्याचा परस्पर अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. 1 एप्रिल 2016 ते 14 जुलै 2017 या कालावधीत हा प्रकार घडला. प्रारंभी हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू होते; पण वृत्तपत्रात यासंदर्भातील बातम्या आल्यानंतर व्यवस्थापनाने या शॉपीचे लेखा परीक्षण करण्याचा निर्णय घेतला. संघाचे चार्टर्ड अकौंटंट सुशांत फडणीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कालावधीचे लेखा परीक्षण केल्यानंतर हा अपहार उघडकीस आला. 

श्री. फडणीस यांनी केलेला लेखा परीक्षण अहवालात पवार याने संघाकडे भरलेले 18 लाख 20 हजार रुपयांचे धनादेश वटलेले नाहीत. 32 लाख 43 हजार रुपयांचा मालच शॉपीत नाही, तर या शॉपीतून विकलेल्या मालाचे 12 लाख 84 हजारांची रक्कम संघाकडे जमा केलेली नाही. या तिन्ही मुद्यांच्या आधारे त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सादर केला. या प्रकरणातील संशयित अमित हा माजी संचालिकेचा मुलगा आहे. त्यामुळे हे प्रकरण पैसे भरून मिटवण्याच्या हालचाली सुरू होत्या. अद्याप याप्रकरणी अमितला अटक झालेली नाही. 

"सकाळ' ने वाचा फोडली 
"गोकुळ' च्या या शॉपीत 65 लाखांचा अपहार झाल्याची बातमी सर्वप्रथम "सकाळ' ने दिली होती. सहा महिन्यांपूर्वीच हा अपहार उघडकीस आला होता; पण कारवाईसाठी टाळाटाळ सुरू होती; पण "सकाळ' ने वाचा फोडल्यानंतर तातडीने या शॉपीचे लेखा परीक्षण करून आज याप्रकरणी अमित पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.