चहाची गोडी सुवर्णमहोत्सवातही कायम

चहाची गोडी सुवर्णमहोत्सवातही कायम

कोल्हापूर - चहा दहा पैसे, रुपयाला पाच लिटर दूध. चहा तयार करायचा तर रॉकेल व कोळसा. आता चहा झाला पाच रुपये तर दूध लिटरला पंचवीस रुपये. या चढत्या दराप्रमाणे जीवनातील चढ-उतार अनुभवत गुंडूपंत लक्ष्मण पसारे यांचा चहा व्यवसायात ५१ वर्षे पूर्ण केली आहेत. आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल परिसरात त्यांची चहा गाडी असून वयाच्या अकराव्या वर्षापासूनचा त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे.

एखादा व्यवसाय सुरू केला तर त्यात यश येईल की नाही, हे सांगता येत नाही. हा धोका पत्करून व्यवसायात उतरण्याचे धाडस फारसे केले जात नाही. पहिली पास असलेले पसारे यांनी मात्र व्यवसायातील धोका पत्करून अकराव्या वर्षीच चहा गाडी सुरू केली. पसारे मूळचे धामणे (ता. गडहिंग्लज) येथील. त्यांचे आई-वडील शेतकरी. साडेतीन एकर शेती असली तरी त्यात सहा भाऊ वाटेकरी. घरची परिस्थितीही बेताची. त्यामुळे या साऱ्यांना पहिलीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर कोल्हापुरात यावे लागले. 
मोठा भाऊ बंडूपंत यांनी त्यांना चहा गाडी सुरू करून दिली. आयर्विन हायस्कूलच्या चौकात १९६६ ला त्यांचा चहागाडीचा व्यवसाय सुरू झाला.

दिवसभर गाडीवर थांबून चहा विकणे सुरू झाले. मुलगी अश्‍विनी, अर्चना व मुलगा नितीन यांचे शिक्षण चहाच्या गाडीतून मिळणाऱ्या पैशावरच केले. अश्‍विनी बारावीपर्यंत शिकली. अर्चनाने कला शाखेतून पदवी घेतल्यानंतर डी. एड्‌.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. नितीनचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून, त्याचे आता सर्व्हिसिंग सेंटर आहे. पसारे यांचे रेणुका मंदिर परिसरातील चव्हाण कॉलनीत स्वत:चे घरही आहे.

नेटाने व्यवसाय करा
पसारे आजही चहा व्यवसाय करतात. त्यांचे ठरलेले गिऱ्हाईकही आहेत. ते तीस वर्षांपासून त्यांच्याकडेच चहा प्यायला येतात. दिवसभरात पाचशे ते सहाशे कमाई होते. पण, प्रत्येक दिवशी ती होईलच असेही नाही, असा खुलासाही करतात. ते म्हणतात, ‘‘प्रामाणिकपणे कोणताही व्यवसाय केला, तर पैसा मिळतो.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com