सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी - प्रकाश अाबिटकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

कोल्हापूर - दहा वर्षांपूर्वी काँग्रेस आघाडी सरकारने देशातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचा फायदा प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना झालेला नाही. या शेतकऱ्यांनी कर्ज फेडले हा त्यांचा गुन्हा आहे का ? अशी विचारणा करत आमदार प्रकाश अाबिटकर यांनी शासनाने सरसकट कर्जमाफीचा निर्णय तत्काळ घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. 

ज्या बळीराजाने संपूर्ण देशाला तारले, त्या शेतकऱ्याला संपावर जावे लागणे ही बाब दुर्दैवाने महाराष्ट्राच्या वाट्याला आली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र गेली दोन वर्षे राज्यात सततचा दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस, गारपीट आदी कारणांनी शेतकरी अार्थिक अरिष्टात सापडला आहे. सरसकट कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी मोर्चे, आंदोलन सुरू आहे. या आंदोलनांनी दिवसेंदिवस उग्र रूप धारण केले आहे. यावर उपाय म्हणून अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा करून सरकार प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचे श्री. अाबिटकर यांनी निवेदनात म्हटले आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रसंगी उपासमार सहन करून बॅंकेची वसुली दारात येऊ नये, म्हणून कर्जाची परतफेड केली आहे. मात्र प्रामाणिकपणे कर्ज फेडूनही या कर्जमाफीचा फायदा अशा शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर या शेतकऱ्यांनी कर्जफेड करून गुन्हा केला आहे का ? असा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. म्हणून सरसकट कर्जमाफीच झाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे श्री. आबिटकर यांनी निवेदनात म्हटले आहे.