पानसरे यांच्या हत्येची चार्जशीट ‘कॉपी-पेस्ट’च

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचे चार्जशीट म्हणजे ‘सीबीआय’ने नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील चार्जशीटची ‘कॉपी-पेस्ट’ आहे, असा आरोप ॲड. समीर पटवर्धन यांनी आज येथील न्यायालयात केला.

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचे चार्जशीट म्हणजे ‘सीबीआय’ने नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील चार्जशीटची ‘कॉपी-पेस्ट’ आहे, असा आरोप ॲड. समीर पटवर्धन यांनी आज येथील न्यायालयात केला.

पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी ‘सनातन’चा डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी त्यांनी हा आरोप केला.आज (ता. २०) उर्वरित बाजू ते न्यायालयात मांडणार आहेत. येथील जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे.

साधारण दोन-अडीच तास सुरू असलेल्या सुनावणीत आज ॲड. पटवर्धन यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले देत पानसरे हत्येत संशयित आरोपी केलेल्या डॉ. तावडेला विनाकारण गोवल्याची बाजू मांडली. या वेळी न्यायालयात संशयित आरोपी क्रमांक एक समीर गायकवाड उपस्थित होता. पानसरे यांच्या स्नुषा डॉ. मेघा पानसरे, विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे उपस्थित होते.

ॲड. पटवर्धन यांनी सांगितले, की उमा पानसरे यांनी दिलेल्या जबाबात चुकीची माहिती आहे. त्या समोरून गोळ्या झाडल्याचे जबाबात म्हणतात. प्रत्यक्षात कपाळाच्या मागील बाजूने जखम आहे. त्यामुळे मागून गोळ्या झाल्याचे वैद्यकीय अहवालावरून दिसते. दोघे ‘मॉर्निंग वॉक’ला गेले होते, हे खोटे आहे. त्या योगासाठी जात; तर पानसरे हे एकटेच शिवाजी विद्यापीठात चालत जात होते. त्यांची हत्या करायचीच होती तर तेथेच केली असती? दोघे एकत्रित ‘मॉर्निग वॉक’ला जात नव्हते. ते दोघे इडली खाऊन घरी येत होते, तेव्हा हल्ला झाला. त्यांच्या हत्येची टीप त्यांच्याच माहितीतील कोणीतरी दिली असेल, असा संशय आहे. त्याचा तपास ‘एसआयटी’ने करणे अपेक्षित आहे.

‘एसआयटी’ने दाखल केलेले चार्जशीट हे यापूर्वी ‘सीबीआय’ने दाखल केलेल्या चार्जशीटची ‘कॉपी-पेस्ट’ आहे. सारंग आकोळकरसह इतरांची छायाचित्रे येथे पेस्ट करून ती साक्षीदारांना दाखविली आहेत. त्यानंतर त्यांनी ती ओळखल्याचे दिसून येते. त्यामुळेच हे ‘कॉपी-पेस्ट’ आहे.

‘डी. गोपालकृष्णा विरुद्ध सदानंद नाईक’ यांच्या २००४ आणि ‘कर्नारसिंह विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब’ या सर्वोच्च न्यायालयातील खटल्यात आणि ‘ज्योती चोरगे विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र’ या उच्च न्यायालयातील खटल्यात आरोपींची छायाचित्रे दाखवून त्यांना ओळखणे म्हणजे ते आरोपी होत नसल्याचे म्हटल्याचे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले. त्याचे दाखलेही न्यायालयात सादर केले.

‘छात्रधर्म साधना पुस्तक’ आणि प्रत्यक्षातील घटना यांचा काहीच संबंध नाही. प्रत्यक्षदर्शी लहान मुलग्याची साक्ष आणि इतरांच्या साक्षीनुसार मागून गोळ्या झाडल्या आहेत; तर उमा पानसरेंच्या जबाबात पुढून गोळ्या झाडल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा सर्व बनाव असल्याचे दिसते. हा तपास म्हणजे बनाव आहे. तावडे निर्दोष आहे. यापूर्वीच ई-मेल आणि संजय साडविलकर यांची साक्ष यांचा या घटनेशी काहीच संबंध नाही.  या वेळी त्यांचे सहकारी ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते.

जबाबात विसंगती 
माध्यमांशी बोलताना ॲड. पटवर्धन म्हणाले, ‘‘प्रत्यक्षात पानसरे यांच्या हत्येची टीप त्यांच्या माहितीतील कोणी दिली काय, याचा तपास ‘एसआयटी’ने करणे आवश्‍यक आहे. हे चार्जशीट म्हणजे पूर्वी ‘सीबीआय’ने दाभोलकर प्रकरणात दाखल केलेल्याच्या चार्जशीटची ‘कॉपी-पेस्ट’ ‘एसआयटी’ने केल्याचे दिसून येते. त्यामुळेच त्यातील छायाचित्रे येथे दिसून येतात. जबाबात विसंगती दिसून येते. त्यांच्या हत्येची टीप कोणी दिली, हे पुढे येण्यासाठीच पानसरेंच्या व्यवहाराची मागणी आम्ही यापूर्वीही केली आहे. उद्याच्या सुनावणीत याबाबतची सविस्तर माहिती देणार आहोत.

Web Title: Kolhapur News Govind Pansare Murder case