पानसरे हत्याप्रकरण: समीरच्या जामिनावर शनिवारी निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील प्रमुख संशयित समीर गायकवाड याला जामीन देऊ नये, अशी मागणी सरकारी वकिलांनी आज (शुक्रवारी) कोल्हापुरातील न्यायालयात केली. समीरला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. समीरच्या जामिनावर उद्या (शनिवार) होईल, असे न्यायाधिश एल. डी. बिल्ले यांनी सांगितले.

पानसरेंच्या हत्येत समीर सामील असल्याचे ठोस पुरावे आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. साक्षीदार अल्पवयीन आहे. त्यामुळे, समीरला जामीन देऊ नये, अशी मागणी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी कोर्टात केली. अल्पवयीन मुलाने समीरला ओळखले आहे. दोन मोटारसायकलींवरून चौघे मारेकरी आले होते. त्यांनी दोन पिस्तुलांमधून गोळ्या झाडल्या. या हत्येचे ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी साधर्म्य आहे. समीरने खून केल्याचे सिद्ध होण्याइतपत पुरावे असल्यामुळे त्याला जामीन देऊ नये, अशा आशयाचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी सुमारे अडिच तास केला.

त्यानंतर न्यायालयाने समीरच्या जामिन अर्जावरील सुनावणीचा निर्णय उद्या घोषित करीत असल्याचे सांगितले.

या आधी दहा जूनला जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. त्या सुनावणीवेळी समीरच्यावतीने समीर पटवर्धन आणि वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू मांडली होती. 'फरारी असलेला विनय पोवार आणि सारंग आकोळकरने गोळ्या झाडल्याचे उमा पानसरेंनी जबाबात सांगितले असेल तर समीरने काय केले? त्याचा काहीच संबंध नसेल तर त्याला व्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्कानुसार सशर्त जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

पानसरे हत्येतील पहिला आरोपी म्हणून "सनातन' संस्थेचा साधक समीर गायकवाडला पोलिसांनी पावणे दोन वर्षांपूर्वी अटक केली. सध्या तो कळंबा मध्यवर्ती कारागृहात आहे. पटवर्धन यांनी समीरला जामीन मिळावा यासाठी तिसऱ्यांदा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे.