राधानगरी तालुक्यात दोन्ही कॉंग्रेसच सबसे तेज 

राधानगरी तालुक्यात दोन्ही कॉंग्रेसच सबसे तेज 

राशिवडे - राधानगरी तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतींच्या आज झालेल्या मतमोजणीनंतर 18 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, 15 ठिकाणी कॉंग्रेस, तर 17 ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे सरपंच झाल्याचे दिसून आले, तर पहिल्यांदाच धामोड येथे भाजपची स्पष्ट सत्ता येऊन सरपंचपद मिळाले. दोन ठिकाणी शिवसेना, तर एका ठिकाणी शेकाप आणि दोन ठिकाणी अपक्ष सरपंच झाले आहेत. सात ठिकाणी ग्रामपंचायतींवर सत्ता येऊनही सरपंचपद गमावण्याची वेळ आली. काही ठिकाणी अनपेक्षित, तर काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. 

सोळांकूर येथील सत्ता आपल्या ताब्यात राखण्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना यश आले. तालुक्‍याचे लक्ष लागून राहिलेल्या राधानगरी ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे व सुधाकर साळोखे यांच्या आघाडीने गतनिवडणुकीच्या पराभवाचे यावेळी उट्टे काढले. राशिवडे येथे गोकुळचे संचालक पी. डी. धुंदरे व भोगावतीचे संचालक कृष्णराव पाटील यांना स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सरपंचपदाची जागा भोगावतीचे माजी संचालक अविनाश पाटील व जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांनी जिंकली.

घोटवडे येथे विजयसिंह डोंगळे, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे व बी. के. डोंगळे यांनी सत्ता कायम ठेवली, तर कौलव येथे भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील व उपसभापती रविश पाटील यांना विरोधकांकडून पराभूत व्हावे लागले. येथे कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील, सदाशिव चरापले यांनी सर्व जागा जिंकल्या. आवळी बुद्रुक येथे सर्व नेत्यांच्या आघाडीला बहुमत मिळाले असले तरी विरोधकांनी जिंकलेली एक जागा चर्चेची ठरत आहे. ठिकपुर्लीत हिंदूराव चौगले यांच्या आघाडीने सत्ता हस्तगत केली.

पुंगाव येथे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गड जिंकला. धामोडवर नवणे घराण्याची पकड असल्याचे आजच्या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तालुक्‍यात बहुतांश ठिकाणी स्थानिक आघाड्या झाल्या होत्या. तरीही दूधगंगा काठावर राष्ट्रवादीचे आणि भोगावती काठावर कॉंग्रेसचे अधिक सरपंच आल्याने त्या त्या ठिकाणी या पक्षांची पकड कायम असल्याचे दिसून आले. 

तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतींचे कारभारी असे -

कविता शेट्टी (राधानगरी), रूपाली राणे (पडळी), सुवर्णा बरगे (सुळंबी), मारुती चौगले (पिरळ), रेश्‍मा पाटील (बनाचीवाडी), कृष्णात पोवार (राशिवडे बुद्रुक), स्वाती कांबळे (करंजफेण), बाजीराव पाटील (धामणवाडी), आनंदा पाटील (तारळे खुर्द), गणपती कांबळे (तरसंबळे), उल्हास पाटील (आकनूर), युवराज गुरव (दुर्गमानवाड), शंकर पाटील (पाटपन्हाळा), अनिता पाटील (कोते), शिवाजी पाटील (आडोली), बंडोपंत कांबळे (सावर्डे पाटणकर), दत्तात्रय कांबळे (ठिकपुर्ली), डॉ. विलास सरावणे (घुडेवाडी), सर्जेराव कवडे (आवळी बुद्रुक), बाबूराव जाधव (मजरे कासारवाडा), सविता चरापले (कौलव), सुनील कांबळे (मौजे कासारवाडा), तानाजी पाटील (पडसाळी), तेजस्विनी देसाई (चंद्रे), रूपाली पाटील (कांबळवाडी), छाया मालप (आपटाळ), विष्णुपंत एकशिंगे (वाघवडे), बापूसाहेब भिसे (चांदे), सोनाबाई सुतार (कुडूत्री), सुवर्णा गिरीगोसावी (तळगाव), नंदकुमार पाटील (सोन्याची शिरोली), अशोक सुतार (धामोड-लाडवाडी), नंदिनी पाटील (आवळी खुर्द), रूपाली व्हरकट (शिरगाव), गणपती पाटोळे (पुंगाव), केरबा पाटील (केळोशी बुद्रुक ), दत्तात्रय गुरव (कासारपुतळे), सुवर्णा कांबळे (घोटवडे), सचिन आबदार (टिटवे), जयश्री भोईटे (तुरंबे), राजेंद्र पाटील (सोळांकूर), सदाशिव चौगले (माजगाव), विलास पाटील (शेळेवाडी), सुनीता कांबळे (मोहडे), आशा कांबळे (राशिवडे खुर्द), रोहिणी पाटील (मांगोली), सुभाष पाटील (वलवण), सुभाष पाटील (सिरसे), सुप्रिया सावंत (हसणे), राजेंद्र चौगले (आमजाई व्हरवडे). 
 
ए. वाय. यांचा गड शाबूत 
सोळांकूरचा किल्ला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी अबाधित ठेवलाच, शिवाय त्या कार्यक्षेत्रातील बहुतांश ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवत ठेवला. 

गड आला; पण... 
तालुक्‍यातील पिरळ, राशिवडे बुद्रुक, धामणवाडी, चंद्रे, वाघवडे, कुडूत्री व तुरंबे या गावांमध्ये सत्ता येऊनही स्थानिक नेत्यांना सरपंचपद गमवावे लागल्याने त्यांची अवस्था काहीशी गड आला; पण सिंह गेला अशी झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com