कोल्हापूरात ग्रामपंचायत निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी

कोल्हापूरात ग्रामपंचायत निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी

कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकीय पटलाचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारताना लोकसभा, विधानसभेपासून महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत उधळलेला भारतीय जनता पक्षाचा वारू रोखला. 

कोल्हापूर दक्षिण, करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा; तर कागल, भुदरगड, राधानगरी व गडहिंग्लज तालुक्‍यात राष्ट्रवादीने डंका वाजवला. शाहूवाडीत शिवसेनेने आपला गड राखला तर पन्हाळ्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी मंत्री विनय कोरे यांना घवघवीत यश मिळाले. भुदरगड, चंदगड, शिरोळ तालुक्‍यासह पन्हाळा तालुक्‍यातील काही गावांत स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली. आजरा तालुक्‍यात मात्र भारतीय जनता पक्षाला १४ सरपंचपदासह गावांची सत्ता मिळाली. 

‘दक्षिण’ मध्ये सतेज यांची बाजी
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील १९ पैकीपैकी १४ ग्रामपंचायतींमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या गटाने विजय मिळवला. या मतदार संघातील पाचगांव, उचगांव गावातील श्री. पाटील यांच्या विजयाला विशेष महत्त्व आहे. उर्वरित पाच गावांपैकी चार गावांत भाजप तर स्थानिक आघाडी व अपक्षांना प्रत्येकी एका गावांवर वर्चस्व मिळवता आले. 

कागलात मुश्रीफांचाच डंका
कागल तालुक्‍यातील २६ पैकी १० गावांवर आमदार हसन मुश्रीफ यांनी सत्ता मिळवली. सात गावांवर प्रा. संजय मंडलिक यांची, चार गावांवर माजी आमदार संजय घाटगे यांची तर तीन गावांवर म्हाडा’ चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे वर्चस्व राहिले. एका गावांवर मुरगुडचे प्रविणसिंह पाटील यांनी सत्ता मिळवली. 

शाहुवाडीत सत्यजित आबाच
शाहुवाडी तालुक्‍यातील ४९ पैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ४५ पैकी १५ गावांवर शिवसेना आमदार सत्यजित पाटील यांनी सत्ता मिळवली. १९ ठिकाणी स्थानिक आघाडीला यश मिळाले तर जनसुराज्य शक्ती पक्षाला नऊ व भाजप, राष्ट्रवादीला प्रत्येकी एका गावातील सत्ता मिळवण्यात यश आले. 

गडहिंग्लजचा कौल राष्ट्रवादीला
गडहिंग्लजमध्ये ३३ ग्रामपंयातींसाठी मतदान झाले. त्यापैकी १२ ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीने बाजी मारली. भाजपने नऊ ठिकाणी तर जनता दलाला एक गावांत सत्ता मिळाली. काँग्रेसला तीन तर स्थानिक आघाड्यांनी सात गावांत आपले वर्चस्व राखले. 

भुदरगडमध्ये स्थानिक आघाड्याच
भुदरगड तालुक्‍यात २४ गावांत स्थानिक आघाड्यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीने पाच, भाजपने एक तर माजी आमदार दिनकरराव जाधव व आमदार प्रकाश अबीटकर गटाने सहा गावांवर वर्चस्व मिळवले. तालुक्‍यात ३६ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते, तर आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. 

आजऱ्यात भाजपच वरचढ
आजरा तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर ३१ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. भाजपने १४ गावांत वर्चस्व मिळवत सर्वांनाच धक्का दिला. राष्ट्रवादीला आठ, काँग्रेसला दोन गांवे मिळाली तर इतरत्र स्थानिक आघाडीचाच बोलबाला राहीला. 

शिरोळमध्येही स्थानिक आघाड्याच
शिरोळमध्ये १४ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. शिवनाकवाडी, हेरवाड व उमळवाड गावांवर भाजपने वर्चस्व मिळवले. राष्ट्रवादीला तीन गावांवर विजय मिळवता आला. एका गावांवर स्वाभिमानीची सत्ता आली तर उर्वरित ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे प्राबल्य राहीले. या आघाडीत भाजप, राष्ट्रवादीसह काँग्रेसचाही सहभाग राहिला. 

चंदगडमध्ये स्थानिक आघाडीच
चंदगडमध्ये ३८ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते, या सर्व ग्रामपंचायतीत स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व राहीले. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र तालुक्‍यातील २७१ सदस्यांपैकी ९२ सदस्य आपल्या पक्षाचे असल्याचा दावा केला आहे. काही गावांत भाजप-राष्ट्रवादी तर काही ठिकाणी शिवसेनेसह भरमू पाटील, कै. नरसिंगराव पाटील गट एकत्र सत्तेवर आले. 

पन्हाळ्यात कोरेंचा आवाज
पन्हाळा तालुक्‍यातील ५० पैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ४६ ग्रामपंचायतींपैकी दहा ठिकाणी जनसुराज्य शक्तीने स्थानिक आघाड्यांसोबत सत्ता मिळवली. राष्ट्रवादीला दोन गावांवर वर्चस्व मिळाले. इतरत्र काही ठिकाणी शिवसेना-राष्ट्रवादी तर काही ठिकाणी जनसुराज्य व स्थानिक आघाडीची सत्ता राहीली. 

राधानगरीत दोन्ही काँग्रेसची सरशी
राधानगरीत ६६ पैकी दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ५६ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने १८ गावांतील सरपंच पद मिळवले. १५ गावांत काँग्रेसचे तर १७ गावांत स्थानिक आघाडीचे सरपंच व सदस्य निवडून आले. या तालुक्‍यात शिवसेनेला दोन तर स्थानिक आघाडीने दोन ग्रामपंचायती जिंकल्या. 

करवीरमध्ये काँग्रेसची बाजी
करवीर विधानसभा मतदार संघातील ३१ पैकी नऊ गावांवर सत्ता मिळवण्यात काँग्रेसला यश आले. पाच गावांत शिवसेनेने गड राखला तर तीन गावांत अपक्षांनी बाजी मारली. उर्वरित १४ गावांत स्थानिक आघाडीचे वर्चस्व राहीले असले तरी त्यातही काँग्रेसचाच वरचष्मा दिसून आला.

गगनबावडाही काँग्रेसमागेच
तालुक्‍यातील २१ पैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. काँग्रेसने सात ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले, भाजप व ताराराणी आघाडीला प्रत्येकी एक तर उर्वरित जागांवर आघाड्यांनी वर्चस्व मिळवले. आघाडीत भाजप-काँग्रेसला , भाजप-शिवसेना यांना प्रत्येकी चार, काँग्रेस-शिवसेना, शिवसेना-भाजप-ताराराणी आघाडी व स्थानिक आघाडीला प्रत्येकी एक ग्रामपंचायत मिळाली. 

हातकणंगलेत सत्तांतराचे वारे
हातकणंगले तालुक्‍यातील ४० पैकी १७ ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांना पराभव सहन करावा लागला. १६ गावांतील सत्ता कायम तर सात गावांत स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व राहीले. जनसुराज्यला नऊ, आवाडे पुरस्कृत आघाडीला ७ तर स्थानिक आघाडीला दहा, शेतकरी संघटना व काँग्रेसला प्रत्येकी एक गावांत सत्ता मिळाली. राष्ट्रवादी व शिवसेनेला प्रत्येकी तीन गावांतील सत्ता राखता आली. भाजपाला चार गावचे सरपंच पद मिळाले. दोन ठिकाणी अपक्षांची बाजी राहीली. 

दक्षिण मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपला धोबीपछाड दिली; तर स्वत:ला जिल्ह्याचे नेते म्हणवून घेणाऱ्यांना पुलाची शिरोलीत स्वत:च्या गावातच सत्ता राखता आली नाही. शिरोलीकरांनी अशीच एकजूट भविष्यातही ठेवावी. २०१४ ला भाजपची केवळ लाट होती, हे लोकांच्या लक्षात आले आहे. या निकालाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांतील भाजपच्या कारभाराला चोख उत्तर दिले आहे. 
- सतेज पाटील, आमदार

जिल्ह्याच्या ग्रामपंचायत इतिहासातात प्रथमच भाजपने मोठे यश संपादन केले. भाजपने दिल्लीपासून राज्यात सर्वसामान्य नागरिकांना समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शेतीपासून विविध क्षेत्रांत सामान्य नागरिकांना सक्षम बनविण्यास सुरुवात केल्यामुळेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेनेही भाजपला साथ दिली. १०८ गावांमध्ये सरपंच निवडून आले आहेत. जिल्ह्यातील १२ तालुक्‍यांतील गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीन तालुक्‍यांत भाजपने मोठे यश मिळवले. 
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने भरघोस यश मिळवले आहे. कागल तालुक्‍यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे; तर भाजपला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तसेच जिल्ह्यात एकूण काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला आहे. 
- हसन मुश्रीफ, आमदार

जिल्ह्यात शिवसेनेने चांगली मुसंडी मारली आहे. माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्यासह ठिकठिकाणी स्थानिक आघाड्यांसोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या युतीला यश मिळाले आहे. लोकांनी शिवसेनेवर विश्‍वास टाकला आहे. तो विश्‍वास नक्कीच सार्थ ठरविला जाईल.
-चंद्रदीप नरके, आमदार

लोकांना फक्त फसवण्याचे काम भाजपने केले आहे. एखादे वेळी फसवता येते. लोक वारंवार फसत नाहीत. भाजपच्या पीछेहाटीची ही सुरुवात झाली आहे. भाजपलाही रोखता येऊ शकते हे आम्ही दाखवले.
- पी. एन. पाटील, माजी आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com