करवीर, कागलमधील १९ गावे संवेदनशील

करवीर, कागलमधील १९ गावे संवेदनशील

कोल्हापूर - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी करवीर व कागल तालुक्‍यांतील १९ गावे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. या गावांवर पोलिस यंत्रणेने करडी नजर ठेवली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ३८ जणांना हद्दपार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच निवडणूक काळात गुन्हे दाखल झालेल्यांना तात्पुरते तडीपार करण्यात येत असल्याची माहिती करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी दिली. 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १६ ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. गावपातळीवर होणाऱ्या या निवडणुकीत कमालीची ईर्ष्या असते. त्यातून हाणामारीसारखे प्रसंग घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. निवडणूक शांततेत होण्यासाठी पोलिसांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. करवीर व कागल तालुक्‍याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष असते. तेथे मोठ्या प्रमाणावर राजकीय नेते प्रचारात सक्रियही असतात. 

करवीर तालुक्‍यातील ५३ व कागल तालुक्‍यातील २६ गावांत ही निवडणूक होणार आहे. दोन्ही तालुक्‍यांत एकूण ४४७ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. मागील निवडणुकीच्या अनुभवावरून पोलिस यंत्रणेने दोन्ही तालुक्‍यांतील १९ गावे संवेदनशील घोषित केली आहेत. या गावांवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे. 

निवडणूक काळात या ठिकाणी बाहेरच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शक्‍यतो बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. राज्य राखीव दलाचीही येथे मदत घेतली जाणार आहे. गुप्त यंत्रणेमार्फत या ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक घटनांची माहिती घेतली जाणार आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणाऱ्यांवरही सायबर सेलतर्फे लक्ष ठेवण्यात येणार आहे. गुन्ह्याची पार्श्‍वभूमी असलेल्या दोन्ही तालुक्‍यांतील ३८ जणांवर हद्दपारीची कारवाई पूर्ण झाली आहे. याची अंमलबाजवणी लवकरच केली जाणार आहे.

त्याचबरोबर यापूर्वीच्या निवडणूक काळात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांची यादी काढली आहे. त्यांच्यावरही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे तात्पुरत्या काळासाठी तडीपारीची कारवाई सुरू केली आहे. त्याची अंमलबजावणी आठवड्याभरात पूर्णही केली जाईल.

संवेदनशील गावे -
करवीर तालुका - वडणगे, प्रयाग चिखली, सांगरूळ, कसबा बीड, आर. के. नगर, पाचगाव, मोरेवाडी परिसर, चुये, दिंडनेर्ली, भाटणवाडी, शिंगणापूर, शिरोली दुमाला, हासूर दुमाला, म्हाळुंगे. 
कागल तालुका - कसबा सांगाव, बाचणी, रणदिवेवाडी, व्हनाळी, पिचारीवाडी, आणूर, बामणी.

करवीर, कागल तालुक्‍यांत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. कायदा सुव्यवस्थेसाठी आवश्‍यक उपाययोजना केल्या असून, गुन्हेगारांना तडीपारही केले जात आहे. 
- सूरज गुरव, करवीर पोलिस उपअधीक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com