गटबाजी रोखण्याचे राष्ट्रवादीसमोर आव्हान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी सुरू केलेल्या दौऱ्यात कोल्हापुरातील गटबाजी त्यांना पहावयास मिळाली. सत्तेवर असताना या नेत्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटण्यास, त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यास वेळ मिळत नव्हता. मात्र, सत्तेतून पायउतार झाल्यापासून राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना पक्ष, संघटना आठवू लागली ही चांगली गोष्ट आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळ देऊ लागलेत. पदाला चिकटून बसलेल्या जिल्ह्यातील कारभाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देऊ लागले आहेत. 

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी सुरू केलेल्या दौऱ्यात कोल्हापुरातील गटबाजी त्यांना पहावयास मिळाली. सत्तेवर असताना या नेत्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटण्यास, त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यास वेळ मिळत नव्हता. मात्र, सत्तेतून पायउतार झाल्यापासून राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना पक्ष, संघटना आठवू लागली ही चांगली गोष्ट आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळ देऊ लागलेत. पदाला चिकटून बसलेल्या जिल्ह्यातील कारभाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देऊ लागले आहेत. 

त्यामुळे दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना उभारी मिळण्याची शक्‍यता या दौऱ्याने निर्माण झाली आहे, असे असले तरी राष्ट्रवादीतील वाढत जाणारी गटबाजी रोखण्याचे आव्हान नेत्यांसमोर अजूनही कायम आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्मितीनंतर या पक्षाला जिल्ह्यातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील एक नंबरचा पक्ष झाला; पण तेव्हापासून पक्षाला लागलेले गटबाजीचे ग्रहण आजतागायत सुटलेले नाही. या गटबाजीकडे मतभेद या गोंडस नावाखाली नेत्यांनीही अप्रत्यक्षरीत्या दुर्लक्षच केले. मतभेद असणे हे पक्ष जिवंत असल्याची लक्षणे आहेत, असे सांगून वेळ मारून नेली आहे. मात्र, राष्ट्रवादीमध्ये ज्या वेळी गटबाजी हाताबाहेर गेली किंवा उफाळून आली. त्या वेळी गटाच्या नेत्याचे नुकसान झाले, असे कधीही पहावयास मिळाले नाही. उलट पक्षाचेच नुकसान झाल्याचे पहावयास मिळते. 

यापूर्वी खासदार सदाशिवराव मंडलिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्यात वाद होता. हा वाद टोकाला गेला होता. हा वाद वरिष्ठांनी मध्यस्थी करून मिटवावा, असे सामान्य कार्यकर्त्यांना देखील वाटत होते; पण तसे झाले नाही. या वादात ना मंडलिकांचे नुकसान झाले, ना आमदार मश्रीफांचे.

मंडलिक यांची खासदारकी राहिली, मुश्रीफांचीही आमदारकी राहिली. आता देखील पक्षात खासदार विरुद्ध आमदार, अशीच गटबाजी सुरू आहे. मात्र, त्या वेळची आणि सध्याची परिस्थिती खूप वेगळी आहे. त्या वेळी राष्ट्रवादी राज्यात आणि केंद्रातही सत्तेवर होती. आता मात्र सत्तेवर नाही. असे असले तरी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता आहे. या ठिकाणच्या सत्ता स्थापन करताना या गटबाजीचा फटका पक्षाला बसत असतो. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणल्यामुळेच त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत केलेल्या कसरती आता थांबविण्याचा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे. 

आमदार पवार यांनी दौऱ्यात कारभाऱ्यांची कानउघडणी करत असतानाच सामान्य कार्यकर्त्यांची मते ऐकून घेण्यासाठीही वेळ दिला. त्यामुळे त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी परखडपणे आपली मते मांडली. आमदार पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांची मते ऐकून घेतली. कार्यकर्त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. काही कार्यकर्त्यांशी एकांतात चर्चा केली. सामान्य कार्यकर्त्याचे मत नेत्यांनी ऐकून घेतले, याचेही एक वेगळे समाधान असते.

जमत नसेल तर पदे सोडा
माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी पक्षातील कारभाऱ्यांची कानउघडणी केली आहे. हे करत असताना त्यांनी मुलगा, मुलगी, जावई, मेव्हुणा म्हणून कोणाला पदे देऊ नका, दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील प्रामाणिक कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. खुर्चीला चिकटून राहू नका, जमत नसेल तर पदे सोडा, असेही सांगितले.