बटर, तुपावरील जीएसटी कमी करा - दूध संघ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर -  बटर आणि तूप विक्रीवर आकारला जाणारा १२ टक्के जीएसटी कमी केला तर गायीच्या दुधाला प्रतिलिटर दोन रुपये जादा दर देता येणार आहे, अशी माहिती विविध दूध संघांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांनी दिली. गायीचे कमी केलेले दूध दर पूर्ववत करण्यासाठी शेतकऱ्यांचा रेटा वाढला आहे.

कोल्हापूर -  बटर आणि तूप विक्रीवर आकारला जाणारा १२ टक्के जीएसटी कमी केला तर गायीच्या दुधाला प्रतिलिटर दोन रुपये जादा दर देता येणार आहे, अशी माहिती विविध दूध संघांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांनी दिली. गायीचे कमी केलेले दूध दर पूर्ववत करण्यासाठी शेतकऱ्यांचा रेटा वाढला आहे.

शासनानेही गायीच्या दुधासाठी प्रतिलिटरमागे किमान २७ रुपये देणे बंधनकारक केले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांनी कोल्हापूर येथील एका खासगी हॉटेलमध्ये बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

एनडीडीबीचे अध्यक्ष अरुण नरके म्हणाले, ‘‘राज्यात १ कोटी लिटर दूध संकलन होते. पैकी ७० लाख लिटर दुधाची विक्री होते. उर्वरित दुधाची पावडर करावी लागते. एक किलो दूध भुकटी केल्यास एक लिटर दुधामागे ९.७१ रुपये तोटा होतो. सध्या दूध पावडरचे दर १५५ रुपये व लोणी २७० रुपये किलोने विक्री होत आहे. एकूणच दूध व्यवसायात प्रतिदिन २.९१ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. १ लाख लिटरचा तोटा झाला तर १०० कोटींचा तोटा होता. मग दहा लाख लिटर दूध बंद ठेवले तर किती कोटींचा तोटा होणार याचा हिशेब केलेलाच बर होईल.’’

राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील म्हणाले, ‘‘जीएसटीमुळे संघाच्या तोट्यात वाढ होत आहे. वास्तविक शेतकऱ्यांच्या मालावर जीएसटी आकारून तोटा केला आहे. एकीकडे दुधाला दर द्या म्हणायचे आणि दुसरीकडे विविध कर आकारून दूध संघांना कमकुवत करायची परिस्थिती आहे. या वेळी यशवंत शिराळा दूध संघाचे अध्यक्ष प्रकाश कुनवळ, गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे, सोलापूर दूध संघाचे कार्यकारी संचालक सतीश मुळे, शाहू मिल्कचे कार्यकारी संचालक नंदकिशोर संकपाळ उपस्थित होते. 

अधिकाऱ्यांवर कारवाई करा
‘महानंद’वर शासकीय अधिकारीच काम पाहत आहेत. तरीही त्यांनी गाय दुधाचे खरेदी दर २१ ते २२ रुपयांपर्यंत कमी केले आहेत. शासनाने आधी या अधिकाऱ्यांवर दर कमी केले म्हणून कारवाई करावी. मग दुसऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी महानंदचे उपाध्यक्ष श्री. पवार यांनी केली.

Web Title: Kolhapur News GST on Butter should reduce