"जीएसटी'मुळे साखर खरेदी मंदावली 

राजकुमार चौगुले
बुधवार, 28 जून 2017

कोल्हापूर - जीएसटीचा फायदा खरेदीदारांना होणार आहे. यामुळे जीएसटीची घोषणा झाल्याबरोबर साखरेची खरेदी कमी झाली आहे. एकूणच राज्यातील साखर खरेदीची प्रक्रिया मंदावली आहे. प्रचलित करापेक्षा जीएसटीची रक्कम कमी असून, त्याचा सर्व परतावा खरेदीदारांना मिळणार आहे. जूनच्या साखर खरेदीवर याचा परिणाम झाल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. 

साखरेला पाच टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. सध्या साखरेवर क्विंटलला 195 रुपये कर आहे. प्रत्यक्षात रुपये 71 रुपये अबकारीकर व इतर 124 रुपये शुगर सेस फंडात जातात. एखाद्याने साखर घेतली आणि त्यावर प्रक्रिया करून विकली, तर त्याला 71 रुपये परतावा मिळतो. जीएसटीच्या नव्या नियमानुसार क्विंटलला 5 टक्के जीएसटी असल्यास आणि साखरेचा दर क्विंटलला 3500 धरला, तर 175 आसपास जीएसटीची किंमत होते. प्रक्रिया करताना साखर या कच्च्या मालाचा वापर केल्याने खरेदीदाराला सगळा परतावा मिळणार आहे. यामुळे खरेदीदाराच्या दृष्टीने जीएसटीचा कायदा फायदेशीर ठरणार आहे. 

राज्यातील विविध कारखान्यांतून प्रत्येक महिन्याला सुमारे सहा ते साडेसहा लाख टन साखरेची विक्री कारखान्यांकडून होते. जून संपत आला तरी सध्या ही विक्री चार लाख टनाच्या वर गेली नसल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. जीएसटी लागू झाल्यानंतर नफा होण्याची शक्‍यता असल्याने जेवढी साखर लागते तितकीच साखर खरेदीदारांनी खरेदी केली आहे. साठ्यासाठी साखर खरेदी करण्याचे खरेदीदारांचे प्रयत्न जूनमध्ये झाले नाहीत. साखरेची खरेदी जुलैनंतरच वेगाने होईल, अशी शक्‍यता आहे. 

रेकॉर्ड अद्ययावत ठेवावे लागणार 
नव्या व जुन्या नियमांचा कारखान्यांना प्रत्यक्ष फारसा फरक पडणार नसल्याचे या उद्योगातील सूत्रांनी सांगितले. एक जुलैपासून सगळे रेकॉर्ड अद्ययावत ठेवावे लागणार आहे. याचा अंदाज घेऊनच उद्योगात खरेदी-विक्री सुरू आहे. या सगळ्या व्यवहारात सध्यातरी जीएसटी खरेदीदाराला फायदेशीर ठरेल, अशी चिन्हे आहेत. कारखाने, शेतकऱ्यांना याचा फटका सद्य:स्थितीत तरी फारसा बसणार नसल्याचे या उद्योगातून सांगण्यात आले.