सहकारातील जाणते व्यक्‍तिमत्त्व 

धनाजी पाटील, पुनाळ 
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक, विविध सहकारी संस्थांचे संस्थापक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील जाणते व्यक्‍तिमत्त्व गुंडा रावजी पाटील (जी. आर) यांचे आज (ता. 11) उत्तरकार्य आहे त्यानिमित्त... 

तिरपण (ता. पन्हाळा) येथील सहकाराचे बाळकडू मिळालेल्या राजकीय घराण्यात 1948 साली गुंडा रावजी पाटील अर्थात जी. आर. पाटील यांचा जन्म झाला. नरके विद्यानिकेतन कुडित्रे येथे शिक्षण घेताना डी. सी. नरके यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष (कै.) दौलत नारायण पाटील, (कै.) दत्तात्रय दादू पाटील यांच्या प्रेरणेतून सहकाराचे बाळकडू मिळाले. पदवीनंतर ते सहकार क्षेत्रात उतरले. अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश होता. 1977 साली त्यांनी तिरपण येथे हनुमान दूध संस्थेची स्थापना करून दूध व्यवसाय वाढीस लावला. लगेच 1978 ला लोकमान्य विकास सेवा संस्थेची स्थापना केली. धीरगंभीर, शांत, सुस्वभावी व समोरच्या व्यक्‍तीला विश्‍वासात घेऊन बोलण्याने लोकांवर त्यांचा प्रभाव अखेरपर्यंत पडला. गुंडा पाटील या नावापेक्षा, जी. आर. साहेब याच नावाने ते परिचित होते. वास्तव्य कोल्हापूरात असले तरी नित्यनियमाने ते तिरपणला येत. त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे ते 12 ते 13 वर्षे संचालक राहिले. कै. डी. सी. नरके, अरुण नरके, आमदार चंद्रदिप नरके यांच्या जवळचे, निष्ठावंत संचालक म्हणून त्यांची ओळख होती. कुंभी-कासारी शिक्षण प्रसारक मंडळ, कुंभी बॅंक, यशवंत बॅंक तालुका खरेदी-विक्री संघाचे त्यांनी संचालकपद भूषविले. त्यांच्या पत्नी सुलोचना या यशवंत संघाच्या संचालिका आहेत. हनुमान दूध व लोकमान्य संस्थेच्या निवडणूकीत ही माझी शेवटची निवडणूक म्हणून त्यांनी सांगितले होते. झालेली तसेच 31 ऑगस्ट रोजी कामानिमित्त नित्यनियमाने गावी येणार होते. पण अस्वस्थ वाटल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथेच त्यांनी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सहकारातील आधारवड हरपल्याची जाणीव मात्र प्रत्येकाला सलत राहिलं.