संजय मंडलिकांच्या विजयासाठी रक्ताचे पाणी करणार - मुश्रीफ

संजय मंडलिकांच्या विजयासाठी रक्ताचे पाणी करणार - मुश्रीफ

मुरगूड - ‘‘मतभेदांमुळे संघर्ष होतो. जिल्ह्याचा, राज्याचा विकास खुंटतो. ज्या जिल्हा बॅंकेच्या एका दुर्दैवी प्रसंगाने माझ्यात व स्वर्गीय मंडलिक साहेबांमध्ये वितुष्ट आले, त्याच जिल्हा बॅंकेच्या ए.टी.एम. प्रारंभप्रसंगी आम्ही सर्व एकत्र आलो आहे. मंडलिक साहेबांचे अपूर्ण स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी व मुरगूडचा खंडित झालेला वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी मला, सतेज पाटील व प्रवीणसिंह पाटील यांना शक्ती द्यावी,’’ असे आवाहन करत प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्यासाठी मी आणि माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करू. मुश्रीफ-मंडलिक गट एकत्र आल्यास आमचे लीड तोडण्यासाठी ‘त्यांना’ सात जन्म घ्यावे लागतील, असा विश्‍वासही आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

येथील नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन, तसेच आमदार मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या फंडातील कचरा घंटागाड्यांचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रा. संजय मंडलिक अध्यक्षस्थानी होते. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील, नगरपरिषदेचे ब्रॅंड ॲम्बॅसडर ॲड. वीरेंद्र मंडलिक, युवराज पाटील, भैया माने प्रमुख उपस्थित होते.

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘आम्ही दोघांनी आता ‘स्वच्छता’ करायचे ठरवले आहे. त्याची सुरुवात मुरगूडमधूनच करीत आहोत. बदलत्या राजकारणाच्या समीकरणामुळे आपला शत्रू निश्‍चित करण्याची भूमिका या व्यासपीठाने दिली आहे. २०१४ ला परिस्थिती वेगळी होती. आमदार मुश्रीफांची मोहिनी, पक्षाचे दडपण यामुळे नाईलाज झाला होता;  पण आता कोणतीही चिंता नाही. त्यामुळे जरी त्या वेळी मंडलिकांच्या हातातोंडचा घास हिरावला असला तरी आता मात्र पुढे पंचपक्वानाचे ताट असणार आहे.’’

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, ‘‘आमदार मुश्रीफ यांनी कागलप्रमाणेच मुरगूडवरही आईसारखेच प्रेम दाखवावे. पिण्याचा पाण्याचा प्रश्र मार्गी लावताना तलावाच्या पाण्याचा हक्क आम्ही सोडणार नाही.’’

प्रवीणसिंह पाटील म्हणाले, ‘‘राजकारणाच्या वेळी राजकारण करू. विकासाच्या आपण कधीही आडकाठी आणणार नाही. आम्ही मंडलिकांचा पैरा निश्‍चितच फेडू.’’ जिल्हा शिवसेनाप्रमुख विजय देवणे, ॲड. वीरेंद्र मंडलिक, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांचीही भाषणे झाली.   

या वेळी कागलच्या सभापती सौ. कमल पाटील, सदासाखरचे उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले, शामराव पाटील, विकास पाटील, पंचायत समिती सदस्य विजय भोसले, नंदू पाटील, दत्ता पाटील, प्रकाशराव पाटील, विलास गाताडे आदी उपस्थित होते.
जयसिंगराव भोसले यांनी स्वागत केले. नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुनील डेळेकर यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक मारुती कांबळे यांनी आभार मानले.

एकेकाळचे कट्टर विरोधक, ‘बिद्री’चे संचालक व माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील या व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने कागल तालुक्‍यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासह अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सभास्थळी मोठी गर्दी केली होती. 
          

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com